ढगफुटी झाल्याने लोहरा तलाव फुटून नुकसान
हिंगोली (Lohra Lake) : तालुक्यातील लोहरा पाझर तलाव फुटला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले होते. प्रशासनाने सर्वेक्षण केल्यानंतर २३८४ हेक्टरचे नुकसान झाल्याने त्याच्या भरपाईसाठी ३ कोटी २५ लाख रूपयाचा निधी लागणार आहे. १५ जुलै रोजी झालेल्या ढग फुटीमुळे हिंगोली तालुक्यातील (Lohra Lake) लोहरा पाझर तलावाची एक भिंत फुटल्यामुळे तलावातील पाणीसाठा वाहून गेला होता. त्यामुळे भटसावंगी, खडकद, बोरजा, पिंपळदरी, पळसोना, दुर्गधामणी, सावरखेडा आदी भागातील नाल्याला मोठा पूर आल्याने शेती पिकाचे नुकसान झाले होते.
विशेष करून पिंपळदरी व (Lohra Lake) लोहरा शिवारातील शेती पिकासह जमीन खरडून गेली होती. झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला होता. त्यामुळे खासदार नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांनी स्वतंत्ररित्या पाहणी केली होती. आ.बांगर यांनी तर चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भ्रमणध्वनीद्वारे व्हिडीओ कॉलद्वारे नुकसानीचे चित्र दाखविले होते. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने नुकसानग्रस्तांचे सर्वेक्षण करून शासनाकडे अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.राजेंद्र कदम यांनी यंत्रणेला तात्काळ सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्याने तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकाच्या पथकाने पंचनामे केले. ज्यामध्ये (Lohra Lake) लोहरा तलावाच्या परिसरात असलेल्या शिवारातील ४६८४ शेतकर्यांचे २३७१ हेक्टर जिरायत तर १२ हेक्टर बागायत असे २३८४ हेक्टरचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यामध्ये ४६५८ शेतकर्यांचे १६७२ हेक्टर सोयाबीन, २७६ हेक्टर तुर, ७ हेक्टर उडीद, ४०६ हेक्टर कापूस, ५ हेक्टर ज्वारी, ५ हेक्टर मुग, पिकाच्या नुकसानीचा समावेश आहे.
भरपाईसाठी शासनाच्या निकषानुसार जिरायत क्षेत्राच्या नुकसानीसाठी हेक्टरी १६६०० रूपये प्रमाणे ३ कोटी २२ लाख रूपयांचा निधी लागणार आहे. तसेच २६ शेतकर्यांचे १३ हेक्टरवरील हळदीचे नुकसान झाल्याने मदतीसाठी २७ हजार रूपये हेक्टर प्रमाणे ३ कोटी ५१ लाख रूपयांचा निधी लागणार आहे. एकूण २३८४ हेक्टरच्या नुकसान मदतीसाठी ३ कोटी २५ लाख रूपयांच्या मदतीचा अहवाल शासनाकडे पाठविल्याने हा निधी केव्हा मिळणार, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.