मानोरा (Lok Sabha Elections) : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी घोषित होणार असुन आता केवळ ९ दिवसाचा अवधी शिल्लक आहे. (Election Administration) निवडणुक प्रशासनाने मत मोजणीची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे. दुपारी ४ वाजता पर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात (Washim Election) यवतमाळ, राळेगाव, दिग्रस, पुसद, वाशीम, कारंजा या सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. मतमोजणी ही विधानसभा निहाय होणार आहे. एका विधानसभा क्षेत्रातील मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ याप्रमाणे एकूण ८४ टेबल राहणार आहे. एका फेरीमध्ये ८४ मतदान केंद्रांवरील मतांची मोजणी आहे. साधारणतः ३० फेऱ्यांमध्ये मतांची मोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच टपाली मतमोजणी करण्यासाठी १४ टेबल ठेवण्यात आले. मतमोजणी पार पाडण्यासाठी ४०० पेक्षा जास्त कर्मचारी नियुक्त राहणार असल्याचे निवडणूक प्रशासनाने जाहीर केले आहे.
यवतमाळ-वाशीम लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Elections) महायुती व महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची आणि चुरशीची झाली. आमचाच विजय होणार असे दावे – प्रतिदावे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या समर्थकांकडून केले जात आहेत. यापैकी कोणाच्या दावे प्रतिदाव्यात तथ्य आहे आणि मतदार राजांनी आपला कौल नेमका कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात टाकला, हे निवडणूक निकालातून कळणार आहे.