मानवाधिकार आयोगासमोर सुनावणी सुरु पुढील तारीख २३ जुनला….!
परभणी (Somnath Suryavanshi) : येथील सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) याचा मृत्यू मारहाणीनंतर झाला असल्याचा ठपका न्यायदंडाधिकारी यांनी आपल्या चौकशी अहवालात ठेवला. ४५१ पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आयोगानेही गुरुवारी त्याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१५ डिसेंबरच्या पहाटे परभणी जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून सोमनाथ (Somnath Suryavanshi) यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यावर डॉक्टरांनी सकाळी ७ च्या सुमारास त्यांना मृत घोषित केले. या मृत्युनंतर राज्यभर सोमनाथच्या मृत्युस जबाबदार असणार्यावर कारवाई करण्याची मागणी विविध आंदोलन करून करण्यात आली. सोमनाथच्या कुटुंबांनी पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ चा मृत्यू झाला असा आरोप केला. सूर्यवंशी कुटुंबीयांनी प्रियदर्शी तेलंग यांच्यामार्फत मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल केली आहे.
त्याशिवाय किशोर कांबळे, संदेश मोहिते, मेहराज सय्यद जिलानी व अन्य अशा तीन तक्रारीही दाखल आहेत. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. एम. बदर व सदस्य संजयकुमार यांच्या खंडपीठासमोर या प्रश्नी गुरुवारी सुनावणी झाली. सोमनाथ यांच्या आई विजयाबाई व भाऊ प्रेमनाथ हेही उपस्थित होते. परभणी जिल्हा तुरुंगाचे अधीक्षक प्रशांत पाटील तसेच परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या वतीने पोलिस निरीक्षक अशोक जटाळ यांनीही या प्रकरणाशी संबंधित अहवाल व कागदपत्रे दाखल केली.
तसेच न्यायदंडाधिकारी सी. यू. तेलगावकर यांनी केलेल्या चौकशीचा गोपनीय अहवाल नुकताच मानवाधिकार आयोगात दाखल करण्यात आला आहे. या अहवालात सोमनाथ चा मृत्यू पोलीस मारहाणीत झाल्याचा ठपका ठेवला आहे. आयोगाने या (Somnath Suryavanshi) प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जुनला ठेवली आहे.