परभणी/गंगाखेड(Parbhani):- पूर्वी जामीन घेतलेला असतांनासुद्धा दुसऱ्यांदा जामीन घेणे चौघांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी न्यायालयातील वरिष्ठ लिपिक तथा प्रभारी सहाय्यक अधिक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा (crime of fraud) दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्यांदा जामीन घेणे चौघांना चांगलेच पडले महागात
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील वाघदरा येथील बालाजी पंढरीनाथ सानप, गोविंद बालाजी सानप, राजु गोविंद सानप व आरबुजवाडी येथील उत्तम नामदेव मुंडे यांनी दि. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी जामीन घेतलेली असतांनासुद्धा संगनमताने विचार विनिमय करून दि. १४ एप्रिल २०२४ रोजी कार्यालयीन वेळेत दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर गंगाखेड यांच्यासमोर शपथेवर यापूर्वी कोणाचा ही जामीन घेतला नाही असे खोटे बोलून न्यायालयाची (court of law) फसवणूक केली असल्याची फिर्याद कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ लिपिक तथा प्रभारी सहाय्यक अधिक्षक रत्नप्रभा लक्ष्मणराव पंडित यांनी दिल्यावरून शुक्रवार २७ डिसेंबर रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात वरील चौघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर हे करीत आहेत.