बुलढाणा (Mahalakshmi) : “आली गवर आली, सोनपावले आली..” गणपतीच्या दिवसांत गौरी माहेरी येते, वेगवेगळ्या प्रांतांनुसार, प्रदेशांनुसार आणि समाजानुसार गौरीचे रूप वेगवेगळे असते अन् गौरीची नावेही. वेगवेगळ्या ठिकाणी (Mahalakshmi) गौरीच्या बसवण्याची जशी पद्धत बदलते तशीच गौरीला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्याचीही पद्धत बदलते. गौरीला माहेरवाशीण म्हणून संबोधले जाते. यासाठीच या दिवसात तिचे सगळे लाड पुरवले जातात.
विदर्भात महालक्ष्मीच्या (Mahalakshmi) आगमनाच्या दिवशी त्यांना भाजीभाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. तर दुसऱ्या दिवशी पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो. मोदक, करंज्या, सांजोऱ्या यांचा फुलोरा बनवला जातो. हा फुलोरा महालक्ष्मीच्या वर किंवा तिच्या साडीमध्ये ठेवला जातो. महालक्ष्मींच्या नैवेद्यामध्ये कोशिंबीर, विविध प्रकारच्या चटण्या, मोदक, पुरणपोळी, उडदा-मुगाचे वडे, घोसाळ्याची, अळूची भजी, कढी, आंबील, नकुल्यांची खीर, पंचामृत, सोळा भाज्यांपासून तयार केलेली भाजी, भात-वरण असे अनेक पदार्थ असतात.
मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातही अनेक घरी गौरी विराजमान झालेल्या आहेत, आज त्या माहेरपण संपवून पुन्हा सासरी निघणार आहे. महालक्ष्मी साधारणत: उभ्या केलेल्या असतात. परंतु बुलढाण्यात अंकिता विजय घ्याळ यांनी कल्पकतेतून दोन्ही (Mahalakshmi) महालक्ष्मीची स्थापना बसलेल्या अवस्थेत निवांतपणे केली आहे. महालक्ष्मी या लेकीचं रूप असतात, लेकी माहेरी आरामात असल्याचं या स्थानापन्नतेतून दिसते. एवढी छान आरास केल्यानंतर तेवढ्याच आरामात खाली बसून महालक्ष्मी पूजन करताना अंकिता घ्याळ व गायत्री काळे यांनी छान पोज दिली.