सूर्योदयसमयी राजमाता जिजाऊंची राजवाड्यात महापूजा !
बुलढाणा (Rajmata Jijau) : ४२७ वर्षे झालीत जिजाऊचा जन्म होऊन, पण अजूनही त्या पहाटेचे तेज कायम आहे.. तिच्या कुशीतून निघालेले शिवकिरणांनी महाराष्ट्रच नव्हेतर मराठी मुलुख व्यापला आहे. १२ डिसेंबर १५९८ राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील माजघरात महाराणी म्हाळसाई यांच्या पोटी जिजाऊ जन्मल्या, त्या दिवशी तिथीनुसार पौष पौर्णिमा होती, आज योगायोग पाहताच पौष पौर्णिमेची पूर्वसंध्या. त्यावेळी राजे लखुजीरावांनी सिंदखेडराजा मुलखात हत्तीवरून साखर वाटली होती. कन्या जन्मल्याचा तो जागतिक आनंद, तोच आंतरराष्ट्रीय जन्मोत्सव सोहळा साजरा होतो मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत. १९८२ ला हा (Rajmata Jijau) जन्मोत्सव सोहळा शासकीय पातळीवर सुरू केला, तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी. १९९२-९३ पासून सार्वत्रिक पातळीवर सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून या जन्मोत्सव सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवली ती, मराठा सेवा संघाने शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतून. आज हा सोहळा तमाम जिजाऊभक्तांचा भावनिक आकर्षणाचा ठरतोय केंद्रबिंदू !
आज रविवार १२ जानेवारी रोजी अगदी पहाटे सूर्योदयसमयी, ज्यावेळी राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा जन्म झाला होता तेव्हा.. मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात मराठा सेवा संघ, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रकाश सिंदखेडराजा नगरपालिकेच्या वतीने महापूजा करण्यात आली. अल्हाददायक वातावरण, सर्वत्र रोषणाईचा झगमगाट आणि हजारो जिजाऊ (Rajmata Jijau) प्रेमींच्या उपस्थितीत येथील राजे लखोजीराव जाधव राजवाड्यात व जिजाऊंच्या जन्मस्थळी केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव, महाराष्ट्राचे कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांच्याहस्तेही महापूजा पार पडली.
ज्या कुशीत या महाराष्ट्रचं नेतृत्व घडलं व वाढलं, ज्यांनी या महाराष्ट्राला एक नव्हे तर दोन दोन छत्रपती दिलेत.. अशा स्वराज्य संकल्पिका माँ साहेब जिजाऊ. स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब (Rajmata Jijau) यांच्या जयंती उत्सवानिमित्त रविवारी पहाटेच सूर्योदयापूर्वी हजारो जिजाऊ प्रेमींची गर्दी उसळली. सर्वप्रथम प्रथेनुसार मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच राजे लखोजीराजे जाधव यांची वंशज जाधव कुटुंबीयांनी महापूजा केली. तद्नंतर सर्व जिजाऊप्रेमींनी जिजाऊ जन्मस्थळी अभिवादन केले. महापूजेनंतर, जिजाऊ पाळणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत आसमंत दुमदुमले.
दरम्यान, लखोजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव यांनी सर्वप्रथम माध्यमांशी संवाद साधला. सिंदखेड राजा पर्यटन केंद्राचा आंतरराष्ट्रीय पर्यटनात गणना व्हावी, अशी मागणी शासन दरबारी त्यांनी केली.