विशेष संपादकीय
– प्रकाश पोहरे
भारतीय जनता पक्ष राज्यातील चवथ्या क्रमांकाचा पक्ष हा २०१४ मध्ये पहिल्या क्रमांकावरील पक्ष झाला. याला मुख्य कारणीभूत ठरले धनगर आरक्षण. भाजप आरक्षण देईल म्हणून धनगरांनी भाजपला एक गठ्ठा मतदान केलं; परंतु ५ वर्षांत भाजपने आरक्षण काही दिलं नाही म्हणून धनगर आता गळा काढून रडत आहेत.
भाजपला २००० पूर्वी महाराष्ट्रात अजिबात स्थान नव्हते. त्या काळात मा. बाळासाहेब ठाकरे आणि खा. शरद पवार ही दोन नक्षत्र एकमेकांसमोर दंड थोपटून लढत होते. दोघही प्रसिद्धीच्या शिखरावर होते. त्यावेळी भाजप पाळण्यात खेळत होता; पण हे पाळण्यातील बाळ खूप हुशार होते. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे बोट घट्ट धरून स्वतःची वाढ करून घेतली आणि तो हळूहळू राज्यात चवथ्या क्रमांकावर पोहचला. त्यांनी शिवसेनेशी दोस्ती करून एक करार करून घेतला. आम्हाला राज्य पातळीवर नाही, तर देश पातळीवर रस आहे, तुम्हाला देश पातळीवर रस नाही, राज्य पातळीवर रस आहे. केंद्रात आम्ही मोठे भाऊ, राज्यात तुम्ही मोठे भाऊ. याचा अर्थ स्पष्ट होता. दिल्लीत पंतप्रधान भाजपचा आणि मुंबईत मुख्यमंत्री शिवसेनेचा. हा त्यांच्या युतीचा फॉर्म्युला.
त्यासाठी राज्यात जास्त लोकसभा भाजप लढविणार आणि (Maharashtra Assembly Elections) विधानसभेच्या जास्त जागा शिवसेना लढणार. त्यासाठी त्यांनी ९ चा आकडा लकी ठरवून जागा वाटप केल्या. विधान सभेत
शिवसेना १७१
भाजप ११७
१+७+१ =९
१+१+७ =९
असा जागा वाटप फॉर्म्युला ठरला होता. हा फॉर्म्युला स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. प्रमोद महाजन व स्व. गोपीनाथ मुंडे यांनी ठरविला होता. आता या तिघाही नेत्यांचे निधन झाले आहे आणि हा फॉर्म्युलाही मृत झाला.
२०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत सेना- भाजपची युती झाली होती आणि तेव्हा गोपीनाथ मुंडे हयात होते. नंतर त्यांचे ‘संशयास्पद’ निधन झाले आणि विधानसभा निवडणुका लागल्या. यावेळी भाजपने ११७ पेक्षा जास्त जागांची मागणी करत युती तोडली. याचे कारण होते, की धनगरांसारखा खूप मोठा जाती समूह भाजप सोबत होता आणि मोदी साहेबांची हवा होती. त्यांचा अंदाज खरा ठरला. १२२ जागा जिंकत भाजप विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला. मग भाजप +सेना यांची युती होऊन नवे सरकार स्थापन झाले; पण भाजप अधून-मधून शत प्रतिशत भाजपच्या घोषणा देतच होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकी पूर्वी भाजपने पक्ष वाढीसाठी काँग्रेस, आणि राष्ट्रवादीमधून अनेक बड्या नेत्यांची आवक केली, तरी स्वबळावर भाजप उमेदवार निवडून येतील याची त्यांना खात्री वाटत नव्हती म्हणून त्यांनी पुन्हा शिवसेनेसोबत युती केली आणि त्याच वेळी करारही केला. विधान सभेत १८ जागा मित्र पक्षांना देऊन दोन्ही पक्ष १३५/१३५ जागांवर लढतील, म्हणजे पुन्हा १+३+५ =९ चाच फार्मुला आणि तसा करार सुद्धा झाला.
पण आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी १३५/१३५ जागांचा करारही भाजपने तोडला. मोदींची हवा असल्यामुळे खुद्द उद्धवजी हवालदिल झाले होते म्हणून त्यांनी भाजपच्या दांडगाईला मान्यता दिली. पुन्हा नवा करार झाला.
भाजपने मित्र पक्षासाठी १८ जागा मागून घेतल्या आणि उरलेल्या जागेतून १२४ जागा शिव सेनेला देत स्वतःकडे १४६ जागा घेतल्या. ही शुद्ध लबाडी होती; पण इथेही लबाडी पूर्ण संपलेली नाही. खरी लबाडी पुढे आहे. मित्र पक्षासाठी १८ जागा मागून घेतल्या असताना त्यातल्या पुन्हा ६ जागा भाजपने काढून घेतल्या, आता या जागा झाल्या,
भाजप १५२
शिव-सेना १२४
मित्र पक्ष १२
पण इथेही भाजपची लबाडी संपत नाही. त्यांनी मित्र पक्षाच्या उमेदवारांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशी अट घातली. ही अट, रामदास आठवले, विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांनी मान्य केली; पण महादेव जानकर यांनी त्याला विरोध करत रासपच्या चिन्हावर लढण्याचा हट्ट धरला. भाजप तयार झाला, त्यांनी दोन जागा रासपला सोडून इतर मित्र पक्षाच्या उमेदवारांना कमळ चिन्ह दिले. आता पुन्हा या १० जागा भाजपच्या खात्यात गेल्या. आता भाजपच्या जागा झाल्या १६२. पण इथेही भाजपची लबाडी संपत नाही.
भाजपने रासपला अट घातली. चिन्ह तुम्ही ठरवाल ते आणि उमेदवार आम्ही ठरवू ते. त्या प्रमाणे भाजपने दौंड आणि जिंतूरची जागा रासपला देऊन दौंड साठी राहुल कुल आणि जिंतूरसाठी रामप्रसाद बोर्डीकर हे उमेदवार दिले. या दोघांना रासप बद्दल कोणतीही आपुलकी नव्हती, आत्मीयता नव्हती, हे दोघेही भाजपशी एकनिष्ठ होते. ही भाजपची लबाडी होती, पण ही लबाडीही इथे संपली नाही.
रासपने आपल्या या दोन उमेदवारांसाठी ए बी फॉर्म तयार केले. आणि स्वतः महादेव जानकर पक्षाचे ए बी फॉर्म घेऊन दौंडला गेले आणि बाळासाहेब दोलतोडे जिंतूरसाठी रवाना झाले. हे दोघे फार्म भरायच्या जागी पोहचण्या आधीच फडणवीस साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील यांचे जासुस तिथे पोहचले, त्यांनी भाजपचे ए बी फॉर्म देऊन कुल आणि बोर्डीकर यांचे अर्ज दाखल केले. ही खूप मोठी बेईमानी आणि विश्वासघात होता. याला इतिहासाच्या भाषेत ‘मोगली मसलत’ म्हणतात. भाजपने मोगली मसलत का वापरली? हा त्यांचा प्रश्न पण मोगली मसलत करताना छ. शिवाजी महाराजांचे नाव घेतात हे अनैतिक आहे. आता जागा वाटप असे झाले,
भाजप १६४
शिवसेना १२४
मित्र पक्ष ०००
याला राजकारणात मुत्सद्दीपणा म्हणतात आणि आपल्या सामान्य लोकांच्या भाषेत ‘लबाडी’ किंवा मग ‘गरज सरो नी वैद्य मरो!’ असे म्हणतात. भाजपने मित्र पक्षांची दिशाभूल करत, शिवसेनेची अशी गोची केली, आणि मनोमन ठरवले की पुढच्या निवडणुकीत महायुती करायची गरज नाही, कोणी मित्र नाही आणि शिवसेनाही नाही. शतप्रतिशत भाजप!
ते लक्षात आल्यामुळेच शिवसेना जागृत झाली आणि त्यांनी मग अडीच, अडीच वर्षाचा फॉर्म्युला भाजप समोर फेकला. ज्याला भाजपने स्वीकारले नाही, कारण त्यांना वाटले की शिवसेने समोर पर्याय नाही आणि ते कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस सोबत जाणार नाहीत, मात्र त्यांनी शरद पवार फॅक्टर लक्षात न घेण्याची जी चूक केली ती त्यांना भोवली. त्यानंतर मग भाजपने अजित पवारांना सोबत घेऊन पहाटे उरकलेला शपथविधी आणि दीड दिवसाचे सरकार हे नाट्य लोकांनी पाहिले.
शरद पवारांच्या मार्गदर्शनात नंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आघाडी स्थापन होऊन आघाडीचे सरकार २०१९ मध्ये स्थापन होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.
हाता तोंडाशी आलेला असा घास गेल्यामुळे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांची कॉन्ट्रॅक्टर लॉबी हे सर्व प्रचंड अस्वस्थ झाले. नंतर २०२२ चा सुरत मार्गे गुवाहाटी असे झालेले हवाई नाट्य आणि ‘५० खोके, एकदम ओके’चे रामायण, आणि नंतर अजित पवारांचे घड्याळ ते शरद पवारांची तुतारी हे महाभारत सुज्ञांना आठवत असेलच. सुप्रीम कोर्टाने असांविधानिक म्हणून घोषित केलेले सरकार मागील अडीच वर्षांपासून सत्तेत आहे.
२०२४ च्या ह्या निवडणुका युती व आघाडी आणि लाडक्या बहिणी, लाडका भाऊ ते तीर्थयात्रा या पृष्ठभूमीवर पार पडत आहेत आणि त्याचमुळे २०२४ च्या ह्या (Maharashtra Assembly Elections) निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कौल आता जनतेने द्यायचा आहे.
– प्रकाश पोहरे (९८२२५ ९३९२१)