महाराष्ट्राला सत्काराची नव्हे सद्भावनेची गरज- हर्षवर्धन सपकाळ
बुलढाणा (Harsh Vardhan Sapkal) : याच शहरात जन्मलो, शिकलो अन् वाढलो. शाळेत शिकताना मागच्या बेंचावरचा विद्यार्थी होतो, त्यामुळे माझ्यात अन फळ्यात खूप अंतर राहत गेले.. मात्र शाळेपासून नेहमीच समाजिक कार्याची आवड होती, समाजवादी विचार जवळचा वाटत होता. तेव्हा दिवाकरभैय्या व शशिकलाताई आगशेंसारखी माणसं भेटली. १९८६ साली अकरावी व बारावीला आल्यानंतर तेजनकर सर म्हटले की, शिकू नको, भानगडीत पडू नको.. जेवढं जमेल तेवढंच कर. पुढे जाऊन तु आमदार होणार आहे, तु महाराष्ट्राचा मोठा नेता होणार आहे.. बाबा आमटे यांनी डॉ. सुगन बरंठ यांच्याशी भेट घालून दिली.
अनिल आवचट यांनी डॉ. बावस्कर यांच्याशी ओळख करून दिली. प्रकाश मोहाडीकर यांच्याशी कौटुंबिक पातळीवरचे संबंध निर्माण झाले. तर रमेश कोर्ड व सुधा कोर्डे यांनी सहकार्य केले.. काहींनीतर आर्थिक मदतही केली, हा सर्व चलचित्रपट आज डोळ्यांपुढून जातो आहे. बुलढाण्याचा हा नागरी सत्कार सभ्यतेचा एक संदेश आहे, अशी भावनांना वाट मोकळी करून देत असताना आठवणींचा गहिवर बंटी दादांच्या कंठात दाटून येत होता, निमित्त होते त्यांच्या नागरी सत्काराचे !
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ (Harsh Vardhan Sapkal) यांची निवड झाल्याबद्दल बुलढाणेकरांच्या वतीने शनिवार १ मार्च रोजी नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हर्षवर्धन सपकाळ यांची सायंकाळी हुतात्मा स्मारकापासून गर्दे हॉलपर्यंत वाजत- गाजत रॅली निघाली. यावेळी दादांच्या सुविधा मृणालिनी सपकाळ यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सर्वसेवा संघ नई तालीम समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ, पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर तर प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेचे जिल्हा संघटक संदीप शेळके, सामाजिक कार्यकर्त्या शाहीनाताई पठाण, उमाळा गावचे माजी सरपंच देवरावनाना सपकाळ आदींची मंचावर उपस्थिती होती.
प्रास्ताविकातून संदिप शेळके यांनी हर्षवर्धन सपकाळ (Harsh Vardhan Sapkal) यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देतांना त्यांच्या स्वभावाविषयी सांगताना बंटीदादा यांनी नेहमीच सत्याची वाट पकडली आहे. ते काही झाले तरी ते सोडणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. बुलढाणा जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष विजय सावळे यांनी सर्वप्रथम बुलढाणेकर हे नेहमीच सुसंस्कृतपणा जोपसतांना दिसतात. पक्षमेद व मतभेद विसरून सर्व आपल्या माणसासाठी एकत्र येतांना दिसतात. राजकारणात मतभेद, वाद प्रतिवाद असावे पण मनभेद निर्माण झाले नाही पाहिजेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी नेहमीच तत्वनिष्ठ राजकारण केल्याचे त्यांनी सांगितले. शाहीनाताई पठाण यांनी मृणालिदीताई यांच्यातला साधेपणा सांगून गार्गीची महाराष्ट्रभर गाजलेले पत्र व यश करीत असलेला काम.. याविषयी त्या भरभरून बोलल्या.
डॉ. सुगन बरंठ यांनी हर्षवर्धन सपकाळ (Harsh Vardhan Sapkal) हे महात्मा गांधीच्या विचाराचे अनुयायी आहेत. त्यांनी ज्या दिवशी विषमतेचा मार्ग निवडला त्यादिवशी त्यांच्याशी कुठलाच संबध राहणार नाही. सपकाळ हे कधीच हा विचार सोडणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त करून हिंसेच्या विरोधात अहिंसेच्या मार्गाने काम केले पाहिजे.. असे सांगताना विचारात्मक विवेचन केले. तर डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी बंटीदादातला साधेपणा सांगून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करण्याची आवाहन केले.
सत्काराला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ (Harsh Vardhan Sapkal) म्हणाले की, काँग्रेसचा अध्यक्ष झाल्यानंतर माध्यमांनी ब्रेकिंग केली की आदिवासी समाजाचे सपकाळ हे प्रदेशाध्यक्ष झाल्याने आदिवासी समाजाला न्याय मिळाला.. हे ऐकल्यानंतर आनंद झाला. सातपुड्यातून अण्णा मुजालदाचा फोन आला त्याला कुठले पद हे माहिती नाही. पण त्याला ऐवढेच माहिती होतं की. मला कुठलं तरी मोठं पद मिळाले. आज महाराष्ट्राला सद्भावनेचे गरज आहे. कारण आज माणूस माणसाच्या विरोधात उभा आहे. कुठल्या जातीच्या माणसाकडून किराणा घ्यायचा इथपर्यंत ते आता किर्तन व प्रवचनाच्या कार्यक्रमांसाठी आपल्या जातीचा महाराज आणायचा.. इथपर्यंत आपली संस्कृती रसातळाला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे. त्यासाठी सद्भावना निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे पहिला कार्यक्रम मस्तजोग ते बीड सद्भावाना पदयात्रा आहे. आगामी पाच वर्षात आमदारकी खासदारकीची पदे घ्यायचे नाही. पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काँग्रेसचा करायचा, हा विश्वास (Harsh Vardhan Sapkal) त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला
आचार्य वेरूळकर गुरुजी हे आजारपणामुळे उपस्थित न राहू शकल्यामुळे त्यांचा संदेश चौबे महाराज यांनी यावेळी सभागृहासमोर वाचून दाखवला. यावेळी नागरी सत्कार समितीच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ (Harsh Vardhan Sapkal) व प्रा. मृणालीनी सपकाळ यांचा मानपत्र देऊन सत्कार समिती सदस्यांच्या वतीने करण्यात आला. दादांची वहीतुला ज्यावेळी करण्यात आली, कार्यक्रमानंतर शहरातील अनेकांनी वही व पेन देऊन त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रणजीतसिंग राजपूत यांनी केले. यावेळी अनेक बुलढाणेकर प्रामुख्याने उपस्थित होते.