लवकरच होऊ घातलेली विधानसभेची (Assembly) निवडणूक लक्षात घेता केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet) महाराष्ट्राला चांगले प्रतिनिधीत्व मिळेल ही अपेक्षा होतीच आणि तसे ते मिळाल्याचे दिसते. अर्थात काही धक्कादायक गोष्टी देखील पाहायला मिळाल्या. मागच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री राहिलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना किमान पहिल्या यादीत तरी स्थान मिळालेले नाही. भाजपने त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यानंतर ते यशस्वी झाल्यास त्यांचे केंद्रीय मंत्रिमंडळातील (Union Cabinet) स्थान कायम राहील असेच वाटत होते, परंतु तसे झालेले दिसत नाही. महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही या मंत्रिमंडळात सध्या तरी स्थान मिळालेले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांना राज्यमंत्रीपद (Minister of State) स्वतंत्र पदभार हे पद देऊ करण्यात आले होते, परंतु आधी आपण केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पद भूषवले असल्यामुळे हा प्रस्ताव आम्ही मान्य केला नाही असे प्रफुल्ल पटेल यांनी स्वतःच सांगितले. कदाचित पुढच्या मंत्रीमंडळ विस्तारावेळी त्यांना संधी मिळू शकते. नारायण राणेंनाही पुढच्या विस्ताराची प्रतीक्षा असेल. सध्याच्या मंत्रिमंडळात भाजपकडून नितीन गडकरी, पियुष गोयल, मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे यांना तर शिंदे सेनेकडून प्रतापराव जाधव यांना संधी मिळाली आहे. रामदास आठवले यांना मंत्रिमंडळातील स्थान कायम राखण्यात यश आले. पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेलेल्या मुरलीधर मोहोळ यांना उदयन राजे भोसले यांचा अधिक मजबूत दावा असताना बाजूला सारत संधी देण्यात आली, या निर्णयाने अनेकांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील.
महाराष्ट्रातून अशाप्रकारे एकूण सहा सदस्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet) स्थान मिळाल्याचे दिसते. पुढे मागे प्रफुल्ल पटेल देखील मंत्रिमंडळात समाविष्ट होतील. या पृष्ठभूमीवर नारायण राणे आणि उदयन राजे भोसले यांना भविष्यात देखील संधी मिळण्याची शक्यता क्षीण आहे. रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ ही दोन नावे थोडी अनपेक्षित म्हणता येतील. रक्षा खडसे लागोपाठ तिसर्यांदा निवडून आल्या आणि महिला म्हणून देखील त्यांना संधी मिळाली असावी, परंतु मुरलीधर मोहोळ यांचे नाव मात्र अनेकांना बुचकाळ्यात टाकणारे आहे. शिंदे सेनेकडून श्रीकांत शिंदे यांचे नाव चर्चेत होते, परंतु परिवारवादाचा आरोप टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जेष्ठ नेते प्रतापराव जाधव यांना संधी दिली असावी. नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांचे मंत्रिमंडळातील स्थान निश्चितच होते, फक्त आता त्यांना कोणते खाते दिले जाते हीच उत्सुकता आहे.