मुंबई (Legislative Council Election 2024) : विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आज दुपारी 3 वाजता मावळली. अर्ज भरलेल्या 12 उमेदवारांपैकी कोणत्याच उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्यामुळे आता निवडणूक (Legislative Council Election) होणार हे स्पष्ट झाले. भाजप 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, अपक्ष 1, काँग्रेस 1 व उबाठा शिवसेना 1 असे 12 उमेदवार रिंगणात राहणार आहेत. प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी किमान 23 मते मिळवणे आवश्यक आहे.
भाजपला आपले सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी 115 मतांची आवश्यकता आहे. त्यांच्याकडे समर्थन देणाऱ्या अपक्ष मिळून 113 मते आहेत. त्यांना अतिरिक्त 2 मतांची तजवीज करावी लागणार आहे. शिंदे शिवसेनेला आणखी 6 मतांची तजवीज करावी लागणार असून राष्ट्रवादीला (अप) 7 अतिरिक्त मतांची गरज पडणार आहे. काँग्रेसकडे स्वबळावर आपला उमेदवार निवडून येण्याइतके मते असून त्यांच्याकडे अतिरिक्त 14 मतांचा कोटा आहे. त्यामुळे उबाठा शिवसेनेला काँग्रेसचा उंबरठा झिजवावा लागणार आहे. ऊबाठाला तब्बल 16 मतांचा जोगवा इतर पक्षाला मागवा लागणार आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाने (Sharad Pawar) अगोदरच शेकापचे जयंत पाटील यांना समर्थन दिल्यामुळे उबाठा शिवसेनेची पंचाईत झाली आहे. मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील की महायुतीतील कोणीतरी एक यापैकी एकाच बळी नक्की जाणार हे आता पक्के झाले आहे. जयंत पाटील यांच्या शेकापचे (Legislative Council Election) विधानसभेत एक दोन सदस्य असताना ते निवडून येतात अशी परंपरा राहिली आहे. यावेळी त्यांच्या पक्षाचा एकही सदस्य विधानसभेत नाही, असे असताना यावेळीही चमत्कार करण्याची किमया ते पार पाडतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे (Ajit Pawar) काँग्रेसचे दोन सदस्य असल्याची माहिती आहे. त्यांना आवश्यक असलेल्या आणखी 5 सदस्यांची गरज ती कोठून भागवतात की शरद पवार गट अजित दादांच्या पारड्यात वजन टाकतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या निवडणुकीत महायुती अधिक आश्र्वस्त दिसत असून मविआ थोडी साशंक असल्याची लक्षात येते. कदाचित 2022 मधे झालेल्या (Legislative Council Election) विधान परिषद निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी दोन योद्धे शिंदे – फडणवीस यांची शिकार करण्यासाठी दबा धरून बसले आहेत, हे निकालानंतर 11 जुलैला स्पष्ट होणार आहे.