एकरी 100 टन ऊस उत्पादन घेणे शक्य!
कृषीभूषण पांडुरंग आवाड : मनसेच्या कृषी नवनिर्माण प्रदर्शनात केला दावा
कृषीभूषण पांडुरंग आवाड : मनसेच्या कृषी नवनिर्माण प्रदर्शनात केला दावा
लातूर (Agricultural Exhibition) : जमिनीची सुपीकता, लागवडीचा हंगाम आणि पद्धत, खत व्यवस्थापन, पाण्याचे व्यवस्थापन आणि रोग व कीड नियंत्रण व्यवस्थापन या पाच मुद्द्यावर लक्ष देत ऊस उत्पादकांना एकरी 100 टन ऊस उत्पादन घेणे शक्य आहे असे प्रतिपादन कृषिभूषण तथा नॅचरल शुगरचे संचालक पांडुरंग आवाड यांनी केले.
लातूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 7 फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या कृषी नवनिर्माण 2025 या (Agricultural Exhibition) कृषी प्रदर्शनात शेवटच्या दिवशी एकरी शंभर टन ऊस शेतीचा मूलमंत्र या विषयावर आवाड बोलत होते. व्यासपीठावर प्रदर्शनाचे आयोजक मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे, जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरसिंह भिकाने, संजय राठोड, महापालिका अभियंता शेख आदी मान्यवर उपस्थित होते. या सत्रानंतर मनसेच्या या पाचदिवशीय कृषी प्रदर्शनाचा समारोप झाला.
पुढे बोलताना पांडुरंग आवाड म्हणाले की, सध्याच्या नैसर्गिक परिस्थितीत तसेच शेतीमालाचे भाव बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देणारे पीक म्हणजे ऊस पीक होय. त्यासाठी शेतकऱ्यांनी ऊस पीक घेणे आवश्यक आहे. उसाचे उपउत्पादन साखर हे नसून आता इथेनॉल ग्रीन हायड्रोजन असे इंधनादि उपउत्पादने तसेच खते उसापासून निर्माण केली जात आहेत. शिवाय सीएनजीचे उत्पादने उसापासून होतात. त्यामुळे आगामी काळात ऊस शेतीला चांगले दिवस निश्चित आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत एकरी 100 टन ऊस घेण्याचा निश्चय करून ऊस लागवडीला लागावे.
त्यासाठी जमिनीची सुपीकता माती परीक्षण करून घ्यावे. ऊस लागवडीचे व्यवस्थापन केल्यानंतर बेणे निवड महत्त्वाचे असते. आठव्या ते दहाव्या महिन्यातील उसापासून चांगले बेणे मिळू शकते शेतकऱ्यांनी अशा चांगल्या प्रतीच्या बेण्याची लागवड करावी. मातीमध्ये अनवाणी पायाने चालत गेला तर पायाला मऊ लागत असेल तर ती जमीन उसासाठी योग्य आहे. त्यामुळे आपण सांगितलेल्या पंचसूत्रीचा वापर करून वर्षभराचे नियोजन करावे आणि शेतकऱ्यांनी ऊस लागवड करून शंभर टन एकरी उत्पादन घेण्याचा निश्चय ठेवावा असे आवाहन त्यांनी केले.
आपल्याकडे साधारणत: ऑगस्ट महिन्यापर्यंत आडसाली ऊस लावला जातो. त्यानंतर ऑक्टोबर मध्ये (Agricultural Exhibition) हंगामी लागवड होते आणि नोव्हेंबरच्या 15 तारखेपासून पुढे सुरू हंगामी लागवड होते. ऊस वाढीचा पहिला चार महिन्याचा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो, आडसाली ऊस लागवड केल्यानंतर चार महिन्याच्या काळात पावसाळा सापडतो त्यामुळे ऊस उत्पादन निश्चितच वाढते शेतकऱ्यांनी आडसाली ऊस केल्यानंतर एकरी शंभर टन उत्पादनाचे उद्दिष्ट गाठू शकतो, असे ते म्हणाले.
दोन लाख लोकांच्या भेटी…
माझ्या शेतीला जवळपास दोन लाख लोकांनी भेट देऊन पाहणी केली माहिती घेतली. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे चेअरमन आले. अनेक मान्यवर नेते, संशोधक आदींनी भेटी दिल्या. चाकूरकर साहेब राज्यपाल असताना आपल्या शेतीला भेट देण्यात आले होते असेही आवाड यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली प्रदर्शनास भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कृषी नवनिर्माण 2025 या कृषी प्रदर्शनास जिल्हाधिकारी वर्षा घुगे यांनी मंगळवारी भेट दिली. यावेळी स्मिता नागरगोजे यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी (Agricultural Exhibition) मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष भाऊ नागरगोजे, मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरसिंह भिकाने यांच्यासह मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या कृषि प्रदर्शनातील संयोजनात भागवत शिंदे, मनोज अभंगे, सचिन सिरसाट, भागवत कांदे, किरण चव्हाण, अंकुश शिंदे, पांडुरंग कदम, बाळासाहेब मुंडे, रणवीर उमाटे, महेश देशमुख, संग्राम रोडगे, वंदनाताई केंद्रे, मूनवर सय्यद, जहांगीर शेख, बालाजी कांबळे, परमेश्वर पवार, योगेश सूर्यवंशी, दौलत मुंडे, मच्छिंद्रा केंद्रे, शिवराज सिरसाट, राम नागरगोजे, नाथराव आंबेकर, राम भंडारे, नाथराव पाटील, संभाजी सिरसाट, गणेश आबेरबांडे आदींनी परिश्रम घेतले.