मुख्यमंत्री यांना दिले ईमेल द्वारे निवेदन
अमरावती (Maharashtra State) : राज्यातील १७ लाख सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी दि.२९ ऑगस्ट २०२४ पासून बेमुदत संपावर जाणार असून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या महत्त्वाच्या मागण्यांच्या सोडवणुकीसाठी (Maharashtra State Primary Teachers Committee) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही संपात सहभागी होणार असल्याचे शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगांवकर यांनी कळविल्याचे राज्य प्रसिध्दीप्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.
संपात सहभागी होण्याबाबतची रितसर नोटीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह अमरावती जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी,प्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प.अमरावती यांना संपाची नोटिस पाठविण्यात आल्याचे अमरावती जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत,जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे यांनी सांगितले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या महत्त्वाच्या मागण्यांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सातत्याने शासनाकडे प्रदीर्घकाळ पाठपुरावा करीत आहे. सतत शासनाकडे विनंती करूनही कोणतीच दाद मिळत नसल्याने (१) दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशन दरम्यान राज्यातील हजारो शिक्षकांच्या सहभागाने आक्रोश मोर्चा काढण्यात आला.मा.शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याबाबत आश्वस्त केले होते.
मात्र त्यानंतर आजतागायत किमान चर्चा करण्यासाठी सुद्धा शासनाला वेळ मिळालेला नाही. (२) राज्यात शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी संपूर्ण राज्यात धरणे-निदर्शने सत्याग्रहाच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. (३) ऑगस्ट क्रांतीदिनी ९ ऑगस्ट २०२४ रोजी निवेदन प्रेषण सत्याग्रहाच्या माध्यमातून निवेदने सादर केलीत. परंतु शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही या (Maharashtra State Primary Teachers Committee) औदासीन्याचे राज्यातील प्राथमिक शिक्षकांना फार शल्य आहे.
राज्यसरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती ने दि.२९ ऑगस्ट २०२४ पासून राज्यात बेमुदत संपाची हाक दिली असून त्याचा नोटीस शासनाकडे पाठविलेला आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या बेमुदत संपात विविध प्रलंबित मागण्यांच्या समर्थनासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा,तेथील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मागण्यांची सोडवणूक होण्यासाठी या बेमुदत संपात सहभागी होत आहे. (Maharashtra State Primary Teachers Committee) प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्ता संवर्धनाच्या नावाखाली राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची संख्या, ऑनलाईन,अशैक्षणिक कामे दैनंदिन अध्यापनाच्या कामात व्यत्यय निर्माण करणारे आहे. विद्यार्थी गुणवत्ता संवर्धनासाठी “शिक्षकांना शिकवू द्या.. विद्यार्थ्यांना शिकू या.” या आर्त विनंतीचा गांभीयपने विचार व्हावा.अशी विनवणी याद्वारे करण्यात आली आहे.