रेल्वे नोकरी भरती

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 12 वी पास तरुणांसाठी 1,688 पदांची मोठी भरती

RRB NTPC UG Recruitment 2026: एनटीपीसी पदभरतीअंतर्गत बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1,688 पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी 15 ऑक्टोबर 2026 पासून ऑनलाइन अर्ज करता येणार..

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 12 वी पास तरुणांसाठी 1,688 पदांची मोठी भरती

RRB NTPC UG Recruitment 2026

 

रेल्वेच्या NTPC भरतीसाठी 13 नोव्हेंबरपर्यंत अर्जाची मुदत

नवी दिल्ली/ मुंबई (RRB NTPC UG Recruitment 2026) : रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) एनटीपीसी पदभरतीअंतर्गत बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1,688 पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी 15 ऑक्टोबर 2026 पासून ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात असून, इच्छुक उमेदवारांना 13 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत अर्ज करता येणार आहे. तिकीट लिपिक, रेल्वे लिपिक यांसह विविध पदांचा या भरतीत समावेश आहे.

कोणाला करता येणार अर्ज?

या (RRB NTPC UG Recruitment 2026) भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे किमान 50 टक्के गुणांची अट आहे. मात्र, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग, माजी सैनिक तसेच बारावीपेक्षा उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना या गुणांच्या अटीतून सूट देण्यात आली आहे. अंतिम परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर न झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही. आवश्यक शैक्षणिक पात्रता 13 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा किती?

उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2027 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे. यासाठी जन्मतारीख 2 जानेवारी 1997 ते 1 जानेवारी 2009 या कालावधीतील असावी. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (नॉन-क्रीमी लेयर) उमेदवारांना तीन वर्षांची सवलत मिळेल. इतर पात्र प्रवर्गांसाठी लागू नियमांनुसार वयाची सवलत दिली जाईल.

पहिल्या संगणकाधारित (CBT-1) परीक्षेचे स्वरूप

पहिल्या संगणकाधारित परीक्षेसाठी (CBT-1) 90 मिनिटांचा कालावधी असेल. (RRB NTPC UG Recruitment 2026) पात्र दिव्यांग उमेदवारांना आवश्यक सुविधांसह 120 मिनिटे दिली जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा केले जातील.

किमान पात्रता गुण पुढीलप्रमाणे:

  • खुला प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS): 40 टक्के
  • इतर मागासवर्गीय (नॉन-क्रीमी लेयर) आणि अनुसूचित जाती: 30 टक्के
  • अनुसूचित जमाती: 25 टक्के

दुसऱ्या (CBT-2) परीक्षेत 120 प्रश्न

दुसऱ्या संगणकाधारित परीक्षेत (CBT-2) एकूण 120 प्रश्न असतील. या परीक्षेसाठीही ९० मिनिटे मिळतील, तर पात्र दिव्यांग उमेदवारांसाठी 120 मिनिटांची तरतूद असेल. या परीक्षेतही प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा केले जातील. दोन्ही परीक्षांमध्ये प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र वेळमर्यादा नसेल. परीक्षेतील विषय, प्रश्नसंख्या आणि भाषेचे पर्याय याबाबतची अंतिम माहिती अधिकृत अधिसूचनेनुसार तपासणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क किती?

सर्वसाधारण प्रवर्गासह इतर पात्र उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 500 रुपये आहे. पहिल्या संगणकाधारित परीक्षेला उपस्थित राहिल्यानंतर नियमानुसार 400 रुपये परत केले जातील. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (EBC) आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये आहे. पहिल्या संगणकाधारित परीक्षेला उपस्थित राहिल्यानंतर नियमानुसार संपूर्ण 250 रुपये परत मिळतील.

अर्ज करण्यापूर्वी ही काळजी घ्या

इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख, आरक्षणासंबंधी कागदपत्रे आणि अर्जातील माहिती काळजीपूर्वक तपासावी. चुकीची माहिती किंवा आवश्यक अटींची पूर्तता न झाल्यास अर्ज बाद होऊ शकतो. (RRB NTPC UG Recruitment 2026) अर्ज करण्यापूर्वी रेल्वे भरती मंडळाची अधिकृत अधिसूचना वाचूनच पुढील प्रक्रिया पूर्ण करावी.