लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे आवाहन
लातूर (Latur District Bank) : केंद्र व राज्य सरकारमध्ये बसलेली मंडळी ही व्यापारी वृत्तीची मंडळी आहे, त्यांना शेतीची कसलीही जाणीव नाही त्यांचे शेतीकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे लोकसभेत आपण या सरकारला धक्का दिलात आता विधानसभेला त्यापेक्षा मोठा धक्का द्या, असे आवाहन करतानाच ‘तोपर्यंत आ. बाबासाहेब पाटील आपल्याकडे आलेले असतील’, अशी टिप्पणी माजी मंत्री सहकार मर्जी दिलीपराव देशमुख (Maharishi Diliprao Deshmukh) यांनी केली.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (Latur District Bank) 41 वी सर्वसाधारण सभा गुरुवारी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून दिलीपराव देशमुख बोलत होते. यावेळी मंचावर खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार तथा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख, उपाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, संचालक आमदार बाबासाहेब पाटील व कार्यकारी संचालक हनुमंतराव जाधव यांच्यासह बँकेचे सर्व संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.
केवळ नफा कमवणे हा हेतू नव्हे, तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणे आवश्यक आहे, हे आमचे ध्येय आहे. एकेकाळी प्रशासक असलेली (Latur District Bank) लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज राज्यातच नव्हे, तर देशात नावाजलेली बँक आहे. आम्ही यशवंतराव चव्हाण यांचा विचार घेऊन काम करत आहोत. चांगले काम केल्याने काही लोकांना त्रास होतो, त्यांच्या पोटात दुखते, त्याला मी काय करणार? असा संवालही त्यांनी केला.
बाबासाहेब तुमची जी ‘लोकसभे’त मदत झाली, त्याबद्दल तुमचे आभार…
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे भाषण या सभेत लक्षवेधी झाले. व्यासपीठावर बसलेले राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या भाषणाचा धागा पकडून बँकेत आल्यानंतर आम्ही एकत्र.. आपण मार्गदर्शक म्हणून दिलीपराव देशमुख साहेबांचा उल्लेख केला; पण बाबासाहेब तुम्ही आम्हाला सोडून (महायुतीत) गेलात. किती अडचण केलात आमची? असा सवाल करीत ‘तसं काही घडलेच, तर एन. आर. पाटलांचा सारखा (अहमदपूर काँग्रेसने लढवावी) आग्रह पूर्ण होईल… महाराष्ट्रात बदल होत चालला आहे. लोकसभेतल्या बदलाचे प्रतीक डॉक्टर काळगे आहेत, असे म्हणत ‘बाबासाहेब तुमची जी ‘लोकसभे’त मदत झाली, त्याबद्दल तुमचे आभार..’ असे उद्गार आ. अमित देशमुख यांनी काढले. राज्य सरकार योजनादूत नावाचे पगारी माणसे सरकारच्या योजना घरोघर पोहोचविण्यासाठी नेमत आहे. सरकारवरचा जनतेचा विश्वास उडाला आहे, याचे हे द्योतक आहे, असे म्हणत ‘विचारावे लागेल की नाही… कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असे आ. देशमुख म्हणाले. यावेळी बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख, खा. काळगे, बाबासाहेब पाटील, अशोक पाटील निलंगेकर आदींची भाषणे झाली. शेवटी बँकेचे उपाध्यक्ष जाधव यांनी आभार मानले.
स्क्रीन टच, चालणारा व टिकणारा मोबाईल…
बँक कर्मचारी (Latur District Bank) व गटसचिवांना 25 टक्के बोनस, पगारदारांच्या पतसंस्थांना साडेदहा टक्के दराने कर्ज तर सोसायटी चेअरमन व मजूर संस्था चेअरमनला स्क्रीन टच, चालणारा व टिकणारा मोबाईल भेट देण्याची घोषणा यावेळी बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख (Maharishi Diliprao Deshmukh) यांनी केली.