देऊळगावराजा (Jayant Patil) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुलुख मैदानी तोफ म्हणून राज्यात परिचित असलेले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक अहिंसा मार्ग देऊळगाव राजा येथे करण्यात आले असून या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील प्रश्न घेऊन महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडीतील सर्व नेते पूर्ण ताकतीने काम करत आहेत. पाच प्रमुख गॅरंटी आम्ही राज्यातील जनतेला दिल्या आहेत. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वाधिक जीएसटी भरतो. मागील महिन्यात महाराष्ट्राने तीस हजार कोटी रुपयांचा जीएसटी भरला आहे. प्रचंड जीएसटी महाराष्ट्रातील जनतेने भरला, मात्र या जनतेच्या पदरात काय पडले नाही. त्यामुळे राज्यात परिवर्तन करून महाविकास आघाडी सत्तेत आणण्यासाठी प्रचाराची रणधुमाळी करण्यात येत आहे, त्याच अनुषंगाने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.