देशोन्नती वृत्तसंकलन
मूर्तिजापूर (Jayant Patil) : निवडणुकीपर्यंत कुणीही लाडके नव्हते. मात्र जनतेने लोकसभेत लावलेल्या चपराकीने सगळे ठिकाणावर आले अन् सारेच लाडके व्हायला लागले. हे पुतना मावशी व सावत्र भावाचं प्रेम असून सावत्रभाऊ फक्त निवडणूकीपर्यंत तीन महिने मदत करेल, यासाठी या भुलथापांना बळी न पडता महाविकास आघाडीला ताकद द्याः उद्याच्या राजकारणात सत्तेत आल्यावर तिनही पक्षाची एकत्रित महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) महाराष्ट्रातील बहिणीना यांनी जेवढे दिले त्यापेक्षा जास्त देण्याचे काम करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज येथे दिला.
रक्षाबंधन पर्वावर सम्राट डोंगरदिवे यांच्याद्वारा जि. प. हायस्कूल क्रीडांगणावर आयोजित ‘राष्ट्रवादी सुरक्षा कवच, भाऊ येतोय भेटीला बहिणीच्या’ कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. महायुती सरकारच्या धोरणाचा खरपूस समाचार घेताना त्यांनी सामान्यांची लूट करणारे सरकार म्हणत वाढती महागाई, त्यावर जीएसटी स्वरूपात आकरण्यात येणारे कर यातून सामान्य माणसांची लूट होत असून महिलांना संसार चालवणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, तरूणांच्या हाताला शाश्वत काम नसल्याने बेरोजगारी वाढली आहे. महाराष्ट्रातील 17 उद्योग बाहेर नेण्याचे पाप या सरकारने केले आहे. ही परिस्थिती बदलावयाची असल्यास, समाधानाचे दिवस बघायचे असतील तर महाविकास आघाडीला सत्तेत येण्याची संधी द्या, सम्राट डोंगरदिवेसारख्या काम करणाऱ्या युवकांमागे उभे राहा, असे आवाहन यावेळी (Jayant Patil) त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दगडपारवा जि.प. सर्कल सदस्य सुमन गावंडे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, सहकार नेते व माजी आमदार अॅड. सुहास तिडके, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. आशा मिरगे, प्रदेश प्रवक्ता तेजस्विनी बारब्दे, माजी आ. रमेश बंग, शब्बीर अहमद विद्रोही, माजी आ. प्रकाश गजभिये, विश्वनाथ कांबळे, अकोला निरीक्षक पांडुरंग ठाकरे, अकोला महानगर अध्यक्ष रफिक सिद्दिकी, महिला जिल्हाध्यक्ष सुमन कावरे, तालुकाध्यक्ष मंगेश कुकडे, शहराध्यक्ष राम कोरडे, रवि राठी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी सम्राट डोंगरदिवे (Samrat Dongardive) यांनी मनोगत व्यक्त करताना मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेने संधी दिल्यास पुढील पाच वर्षे या सुरक्षा विमा कवचाचे नूतनीकरण, महिलांसाठी विविध उपक्रम, बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे आश्वासित केले. यावेळी बाबाराव खडसे, महिला आघाडी अध्यक्षा रंजना सरदार, अनिरुद्ध तिडके, दिवाकर गावंडे, इब्राहिम घानीवाले, दीपाली देशमुख, सुषमा कावरे, विद्या देशमुख, सविता अडसूड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील बहिणीना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फ विमा सुरक्षा कवचची राखी भेट देण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, परित्यक्ता महिला व अपंग महिला यांच्याकरिता विमा देण्यात येणार असल्याची माहिती आयोजक सम्राट डोंगरदिवे (Samrat Dongardive) यांनी यावेळी दिले.
15 लाखांवरून आले 1500 वर : अनिल देशमुख
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी भाजपा महागाई, बेकारी, शेतीमालाच्या भावातील घसरण, जीएसटी या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. भाजपाने आमिष दाखवून 2014 मध्ये सत्तेवर आले. तेच आता 15 लाखांवरून आता 1500 रूपयांपर्यंत आले असून फसवणुकीच्या योजना आणत आहे. महिलांवर अत्याचार, पक्ष फोडाफोडीचे राजकारण करीत असून निवडणुकांना घाबरत आहे. यासाठीच मूर्तिजापूर येथे राष्ट्रवादीचा (तुतारी) चांगला उमेदवार देऊ, असे आश्वासन (Anil Deshmukh) त्यांनी यावेळी दिले.