लातूर (MahaVikas Aghadi) : गतवर्षीचा खरिपाचा पीकविमा तात्काळ मिळावा, औशात महामार्गावर उड्डाणपूल निर्माण करावा आणि औशातील रद्द केलेल्या २४० घरकुलांना तात्काळ मंजुरी द्यावी, या प्रमुख मागण्यांसह इतर अनेक मागण्यांसाठी औसा येथे नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (MahaVikas Aghadi) महाविकास आघाडीच्या वतीने तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Andolan) करण्यात आले.
गतवर्षीचा खरीप हंगामातील पीकविमा (crop insurance) तालुक्यातील शेतकर्यांना अद्याप मिळाला नाही. पावसाचा २१ दिवसांचा खंड पडल्याचा अहवाल १ सप्टेंबर २०२३ ला जिल्हाधिकार्यांनी दिला होता. त्यानंतर २५ टक्के अग्रीम पीकविमा जाहीर केला मात्र तालुक्यातील अनेक शेतकर्यांना तो मिळाला नाही. त्यामुळे २५ टक्के अग्रीम व उर्वरित ७५ टक्के असा सरसकट विमा शेतकर्यांना द्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन (Rasta Roko Andolan) करण्यात आले.
माजी आमदार दिनकरराव माने, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांच्यासह अमर खानापुरे, जयश्री उटगे, शामराव पाटील, दत्तोपंत सुर्यवंशी, आबासाहेब पवार, अजहर हाश्मी, सुरेश भुरे, सनाउल्ला शेख, खुनमिर मुल्ला यांच्यासह महाविकास आघाडी घटक पक्षातील पदाधिकार्यांसह कार्यकर्ते, शेतकरी, घरकुलांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे तब्बल तीन तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी ११ वा. सुरु झालेले हे आंदोलन तहसीलदार व औसा पालिकेचे मुख्याधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर दुपारी २ वा. संपले.
अन्यथा मोर्चा काढू
या विधिमंडळाच्या अधिवेशनात तालुक्यातील पीकविम्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करु, मोर्चे काढू, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी दिला.
जनतेला वेठीस धरले
देशात भाजपा, राज्यात भाजपा आणि औशात आमदारही भाजपाचे आहेत. जनतेच्या सोयीची कामे होण्यापेक्षा जनतेला वेठीस धरण्याचे काम आमदारांनी केले, असा आरोप माजी आमदार दिनकरराव माने यांनी केला.