परभणी (Mahavitaran Department) : प्रधानमंत्री सुर्य घर मोफत वीज योजनेत (PM Surya Ghar Free Power Yojana) रुफटॉप सोलार बसवून परभणी विभागात २२३ जणांनी सौर ऊर्जा निर्मितीला सुरुवात केली आहे, अशी माहिती महावितरणच्या नांदेड विभागाकडून (Mahavitaran Department) देण्यात आली आहे. घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती संच बसवून तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी केंद्र शासनाच्या सहाय्याने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सुर्य घर मोफत वीज (Free Electricity) योजनेचा लाभ नांदेड परिमंडळातील ७ हजार ६०६ वीज ग्राहकांनीघेतला आहे. ६४३ वीज ग्राहक वीज वापरकर्ते नव्हे तर वीज निर्मातेही झाले आहेत.
वीज ग्राहकांना मोफत वीज (Free Electricity) मिळवून देणार्या या योजनेची अंमलबजावणी नांदेड परिमंडळांतर्गत येणार्या परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत आहेत. जिल्ह्यात २ हजार ९२७ वीज ग्राहकांनी अर्ज दाखल केले आहेत. २२३ वीज ग्राहकांनी प्रत्यक्षात सौर ऊर्जा निर्मितीला सुरुवात केली आहे. दरमहा दिडशे ते तीनशे युनिट वीज वापर असणार्या कुटूंंबासाठी दोन ते तीन किलो वॅट क्षमतेची सिस्टम पुरेशी असते. घराच्या छतावर रुफटॉप सोलार वीज निर्मिती प्रकल्प बसवून सौर ऊर्जेचा वापर करत वीज निर्मिती करायची, ती वीज घरी वापरुन विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यामुळे वीज बिल शुन्य होवून वीज मोफत मिळते.
रुफटॉप सोलारसाठी मिळते अनुदान
रुफटॉप सोलार सिस्टमसाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकाला अनुदान देण्यात येते. एक किलो वॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलो वॅटसाठी ६० हजार रुपये व तीन किलो वॅटसाठी ७८ हजार रुपयांचे अनुदान थेट मिळते. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रुफटॉप सोलार सिस्टम बसविली तरी जास्तीत जास्त प्रति ग्राहक एकूण अनुदान ७८ हजार रुपये एवढे निश्चित करण्यात आलेले आहे. या (Free Electricity) योजनेच्या लाभासाठी वीज ग्राहकांनी राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. पीएम सुर्य घर नावाचे मोबाईल अॅपही यासाठी उपलब्ध आहे. शाश्वत ऊर्जा निर्मितीचे एक साधन म्हणून सौर ऊर्जेकडे पाहिले जात आहे. जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी रुफटॉप सोलार योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
दररोज चार युनिट वीज निर्मिती
प्रधानमंत्री सुर्य घर मोफत वीज योजनेत (PM Surya Ghar Free Power Yojana) रुफटॉप वर सोलार बसवून विजेची निर्मिती केली जात आहे. या योजनेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी सौर ऊर्जेची निर्मिती सुरू केली आहे. एक किलो वॅट रुफटॉप सोलार सिस्टम मधून दररोज सुमारे चार युनिट या प्रमाणे दर महिन्याला १२० युनिट वीज तयार होते. महिन्यात दिडशे युनिट पर्यंत वीज वापर करणार्या कुटूंबाला दोन किलो वॅटपर्यंत क्षमतेची रुफटॉप सोलार सिस्टम पुरेशी आहे.