निविदा प्रक्रियेतून बाद चार कंत्राटदारांची पुनर्नियुक्ती
देशोन्नती वृत्तसंकलन
अकोला (Mahavitaran) : महावितरण कंपनीने सर्वसामान्यांना वीज जोडणी देण्यासाठी आवश्यक पायभूत सुविधा उभारणीसाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया मुख्यालयाने घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार राबवली होती. सदर निविदा प्रक्रियेतील निकषानुसार प्रत्येक विभागातील उपविभागांच्या संख्येच्या आधारावर प्रत्येकी ५ असे एकूण १५ कंत्राटदारांची नियुक्ती करणे अभिप्रेत होते. त्या अनुषंगाने १५ कंत्राटदारांची नियुक्ती करून निविदा प्रक्रियेचे सोपस्कार पार पाडण्यात आले होते. परंतु एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अग्रिम रक्कम स्वीकारलेल्या काही लाडक्या कंत्राटदारांना निकषाच्या आधारावर तत्कालीन अधीक्षक अभियंता यांनी असहमती दर्शविल्यानंतरही निवीदा प्रक्रियेतून बाद चार कंत्राटदारांची पुनर्नियुक्ती प्रकरणी अकोला जिल्ह्यातील जवळपास २०-२२ कंत्राटदारांनी अधीक्षक अभियंता यांच्या दालनासमोर दोन तास ठिय्या दिल्यानंतर मुख्य अभियंत्यांनी या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांविरूध्द कारवाईचे निर्देश दिल्याचे वृत्त आहे.
विद्युत भवनात 20 कंत्राटदारांचा 2 तास ठिय्या
दरम्यान, तत्कालीन अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी कान टोचल्याने व (Mahavitaran) तांत्रिक विभागाने असमती दर्शवल्याने कार्यकारी अभियंता जयंत पैकीने यांची अडचण झाली होती. तथापि, अमरावती येथे सहकारी असलेल्या कार्यकारी अभियंता अकोल्यात अधीक्षक अभियंता महणून येत असल्याचे जाहीर होताच त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. अशातच गत १ ऑगस्ट रोजी अधीक्षक अभियंता यांना पत्र लिहून याबाबत मार्गदर्शन मागितले होते. अधीक्षक अभियंता अकोला यांनी त्यांना दिनांक २० ऑगस्टच्या
पत्राद्वारे सोयीचा अर्थ काढता येईल अशा आशयाचे पत्र २० ऑगस्ट रोजीच निर्गमित केले होते. परंतु २१ ऑगस्ट देशोन्नती अंकात (Mahavitaran) ‘महावितरणची लाडका कंत्राटदार योजना’ बातमी प्रकाशित होताच कार्यकारी अभियंता यांनी सदर प्रस्तावित नियुक्त्या प्रलंबित ठेवल्या होत्या. परंतु वर्तमानपत्रात बातम्या आता थांबल्या आणि आता धोका नाही अशी चाहूल लागताच पैकिने यांनी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या निविदेतील खारीज केलेल्या अनेक नावांपैकी चार कंत्राटदारांना नियुक्त केले. विशेष महणजे आकोट विभागाने ज्या कंत्राटदारस काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केली, अशा कंत्राटदारांचीच नियुक्ती पैकिने यांनी केल्याने व्यथित झालेल्या १५ कंत्राटदारांनी तसेच निवदेत बाद झालेल्या इतर कंत्राटदारांसाह सुमारे २० ते २२ कंत्राटदारांनी कार्यकारी अभियंता यांच्या दालनात जाऊन जाब विचारला असता, त्यांनी तो मी नव्हेच अशी भूमिका घेऊन सर्व जबाबदारी अधीक्षक अभियंता यांचेवर टाकली. तसेच यासाठी त्यांच्यावर मुख्यालायचा दबाव असल्याचे सांगितले.
या (Mahavitaran) घटनाक्रमानंतर सर्व कंत्राटदारांनी अधीक्षक अभियाता यांचे कार्यालय गाठले असता, त्यांनी अकोल्यातील प्रतिष्ठित कंत्राटदारांना सुमारे अडीच तास बाहेर ताटकळत ठेवत भेट दिली नसल्यामूळे सर्वांनी थेट मुख्य अभियंता सुहास रंगारी यांचे कार्यालय गाठून वस्तुस्थिति सांगितली असता, त्यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून अधीक्षक अभियंता यांना पाचारण करून जाब विचारला असता, शंभरकर मॅडम यांनी अमरावती परीमंडळ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शन घेतल्याचे सांगितले. यावेळी मुख्य अभियंता रंगारी ह्यांनी मार्गदर्शन घेण्यासाठी मुख्य अभियंता उपलब्ध असल्याचे सांगत त्यांना कानपिचक्या देत सर्व नवीन नियुक्त्या रद्द करण्याचे निर्देशित केले. मुख्य अभियंता यांनी बडगा उगारताच या प्रकरणात माझा काहीही संबंध नसून हा सर्व प्रताप जयंत पैकिने यांनी केल्याचे मान्य केल्याचे समजते.
मुख्य अभियंत्यांनी बजावली कारणे दाखवा नोटीस !
सदर प्रकरणात सकृतदर्शनी सत्यता आढळल्याने तसेच नियमबाह्य नेमणुका करण्यात आल्याने कमालीची नाराजी व्यक्त करत मुख्य अभियंता रंगारी यांनी कार्यकारी अभियंता पैकीने यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याच्या शक्यतेचीसुद्धा चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अधीक्षक अभियंता अकोला यांना दिल्याचे समजते.
कंत्राटदार संघटना आक्रमक !
दरम्यान, या प्रकरणी कंत्राटदार संघटना आक्रमक झाली असून लवकरच ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. (Mahavitaran) महावितरण अंतर्गत कंत्राटदार वरील अन्याय प्रकरणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ऊर्जा मंत्री यांची भेट घेण्यात येणार आहे. या संदर्भात कंत्राटदार संघटनेच्या हालचालींना वेग आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.