Ner :- तालुक्यातील बहुचर्चित अष्टविनायक क्रेडिट सोसायटी अपहार प्रकरणात अखेर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन माजी संचालकांना अटक केली आहे. काल मध्यरात्री बाराच्या सुमारास एसआयटी (SIT)पथकाने अशरफ टिक्की आणि विजय जयस्वाल या दोघांना ताब्यात घेतल्याने प्रकरणात खळबळ उडाली आहे.सदर प्रकरणात तब्बल २८ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप असून, यापूर्वी नेर पोलिसांनी १३ संचालक आणि एका व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक करत आहे. गुन्हे (Crime) दाखल झाल्यानंतर सर्व १४ संचालक फरार झाले होते.
दोन माजी संचालकांना मध्यरात्री अटक, संपत्ती चौकशीला वेग
एसआयटी पथकाने गेल्या काही दिवसांपासून आरोपींच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली होती. अखेर काल रात्री १२ ते १ दरम्यान छापा टाकून दोन्ही माजी संचालकांना अटक करण्यात आली. या कारवाईनंतर इतर संचालकामध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान, फरार असलेल्या सात संचालकांच्या नातेवाईकांच्या संपत्तीची तपासणी सुरू झाली आहे. यासाठी दारव्हा उपविभागीय कार्यालयात संपत्तीचा सविस्तर लेखाजोखा घेतला जात असून, पोलिसांनी काही संशयास्पद व्यवहारांचीही चौकशी सुरू केली आहे.खातेदारांमध्ये प्रकरणाबद्दल असंतोष वाढत असताना, एसआयटी पथकाने कारवाईला वेग दिल्याने लोकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईत डॉ. सिद्धेश्वर भोरे, विजय पवार, शिव कायदे आणि बापुराव बोडखे या अधिकार्यांचा समावेश होता.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही संचालकांना आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक दामोदर वाघमारे यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणातील उर्वरित आरोपींना (Criminal) पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. ‘ही फक्त सुरुवात आहे, आणखी अटकांची शक्यता नाकारता येत नाही,’ असे सूत्रांकडून समजते.