हिंगोली (Tobacco-free) : जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये तंबाखू मुक्तीसाठी दिलेल्या नऊ निकष पूर्तता करून टीएफएस ॲपवर माहिती अपडेट करुन मार्च अखेरपर्यंत तंबाखूमुक्त कराव्यात. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पुढील त्रैमासिक बैठकीत सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत.
राष्ट्रीय तंबाखू (Tobacco-free) नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश टेहरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. शैलेजा स्वामी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, डॉ. सुनिल देशमुख, डॉ. बालाजी भाकरे, शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी नितीन नेटके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, डॉ. गणेश जोगदंड, मानसशास्त्रज्ञ कुलदीप केळकर, सोशल वर्कर आनंद साळवे, मंगेश गायकवाड, अझहर अली, प्रशांत गिरी, भाऊसाहेब पाईकराव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय प्रमुखांनी आपले कार्यालय (Tobacco-free) तंबाखूमुक्त असल्याबाबतचे निर्देश फलक दर्शनी भागात पेंट करून घ्यावे व आपले कार्यालय तंबाखू मुक्त करावे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना 200 रुपये दंड आकारावा. प्रत्येक कार्यालय, बसस्थानक व गर्दीच्या ठिकाणी पथक पाठवून कोटपा कायद्याचे उल्लघंन करणाऱ्याविरुध्द दंडात्मक कार्यवाही करावी. जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयात बाह्य रुग्णांची तपासणी करताना त्यासोबत कर्करोगाचीही प्राथमिक तपासणी करुन संशयितांना समुपदेशनासाठी पाठवावेत, अशा सूचना दिल्या.