परभणी (Manaswini Environment Day) : जागतिक तापमान वाढ (Global temperature) लक्षात घेता दैनिक देशोन्नती मनस्विनी महिलांच्या (Manaswini Group) वतीने वृक्ष लागवडीची स्पर्धा ठेवण्यात आली आहे. ३ ते ५ झाडे लावून महिलांनी त्या झाडांचे वर्षभर संगोपन केल्यास त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. स्पर्धेचा शुभारंभ २३ जून ला सकाळी ११ वाजता सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, वसमत रोड येथे होणार आहे.
आज संपूर्ण जगावर ग्लोबल वार्मिंगचे (Global warming) संकट ओढावले आहे. भविष्यात मानवाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाचा होणारा र्हास वेळीच रोखण्याची गरज आज निर्माण झाली आहे. आपलाही यात खारीचा वाटा असावा या हेतूने मनस्विनी ग्रुपच्या वतीने ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. मनस्विनी सदस्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मनस्विनी महिलांच्यावतीने करण्यात आले आहे.
रविवारी होणार स्पर्धेला सुरुवात; आकर्षक बक्षिसे
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) ही स्पर्धा घेण्यात येत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांची पुर्तता करणार्या झाडांच्या संख्येत वाढ व्हावी, या साठी किमान ३ किंवा त्यापेक्षा अधिक ५ झाडे लावून महिलांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी महिलांना लागणारी झाडे जयहिंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मोफत दिली जाणार आहेत. झाडांचे कुपन दिल्यानंतर कुपन दाखवून पाथरी रोडवरील सरदेशपांडे अॅग्रो नर्सरीमध्ये स्पर्धकांना झाडे मिळतील. किंवा इतर काही ठिकाणी ठेवली जाणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन २३ जून रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धकांना २३ जून ते २६ जुलै २००२४ या कालावधीत झाडांची लागवड करावी लागणार आहे.
आपण लागवड केलेल्या झाडांचा फोटो ९८५०२०९१७८ या क्रमांकावर व्हॉटस् अॅपवर दर तीन महिन्यानंतर पाठवावा लागणार आहे. वर्षभर स्पर्धकांना झाडांचे संवर्धन करावे लागणार आहे. ५ जून २०२५ रोजी स्पर्धेचा निकाल जाहिर होईल. झाडांची सर्वाधिक काळजी घेणार्या विजेत्या स्पर्धकांना (Manaswini Group) मनस्विनी महिलांच्या वतीने पैठणी साडी तसेच इतर अनेक आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिलेल्या मोबाईल नंबरवर सर्व महिलांनी आपली नोंदणी करावी. तेव्हा आपली वसुंधरा सुजलाम् सुफलाम करण्यासाठी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन मनस्विनी ग्रुपच्या संयोजिका मनिषा गोरे यांनी केले आहे.
महिलांना मिळणार मोफत वृक्ष
परभणी येथील जय हिंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. दिपाली संतोष अंधारे व सचिव सौ. अल्का रमेश दळवी या (Manaswini Group) मनस्विनी सदस्यांच्या वतीने वृक्ष लागवड स्पर्धेत सहभागी होणार्या महिलांना मोफत वृक्ष दिली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलेस एक कुपन देऊन वृक्ष दिली जातील. स्पर्धेसाठी देण्यात येणार्या एकूण झाडांंमध्ये एक फळांचे झाड राहील. कुपन घेतल्यानंतर वृक्ष लागवडीचा फोटो पाठवणे बंधनकारक असणार आहे. वृक्ष हे घराच्या अंगणात किंवा जवळपास च्या खुल्या जागेत लावून त्याचे संगोपन करावे लागणार आहे.