कालपासून येवा मंदावला; जिवंत पाणीसाठा ७७ टक्के
लातूर (Manjra Dam) : बीड, धाराशिव व लातूर जिल्ह्यांसाठी भगिरथ ठरलेल्या धनेगाव (ता. केज) येथील (Manjra Dam) मांजरा धरणात ११ सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत ७७ टक्के जिवंत पाणीसाठा जमा झाला होता. काल सोमवारपासून केज व कळंब तालुक्यात पाऊस थांबल्याने धरणपात्रात येणारा येवा कमी झाला आहे. धरणाची १ मीटर पाणीपातळी वाढल्यानंतर धरणाचे दरजावे उघडावे लागतील व मांजरा नदीत पाण्याचा विसर्ग सोडावा लागेल, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
लातूर शहरासह लातूर एमआयडीसी, अंबाजोगाई, कळंब, केज, धारुर या शहरांसह २२ बिगर सिंचन योजनांद्वारे अनेक गावांना (Manjra Dam) मांजरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा पर्जन्यमान सगळीकडे चांगले असले तरी मराठवाड्यात धरणांमध्ये साठा वाढेल असा जोरदार पाऊस झालेला नाही. केवळ भिज व सलग पडून जमिनीत मुरणार्या पाण्यानेच धरणांची पातळी वाढू लागली आहे. मांजरा धरणाची एकूण क्षमता ६४२.३७ मीटार आहे. पैकी ६४१.३७ मीटर पाणी आले आहे.
म्हणजे एक मीटर पाणीपातळी वाढल्यास धरण भरणार आहे. एकूण पाणीसाठा १८३.२२२ दलघमी जमा झाला आहे. मृतसाठा ४७.१३० दलघमी असून, जिवंत साठा १३६.०९२ दलघमी आहे. धरणपात्रात १६.२० क्युसेसने येवा सुरू आहे. मात्र तो कालपासून कमी झाला आहे. रात्रीतून पाऊस वाढल्यास (Manjra Dam) धरण केव्हाही भरू शकते. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडावा लागेल. म्हणून जलसंपदा विभागाने मांजरा धरण परिसर व नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.