सिं. राजा : ‘घड्याळ’ घेवून विधानसभेच्या रिंगणात
बुलढाणा (Manoj Devanand Kayande) : युवक काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून सतत दोन वेळा निवडून आलेले व प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस असलेले मनोज देवानंद कायंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला असून, घड्याळ चिन्ह घेवून ते सिंदखेडराजा मतदार संघाच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी उतरले.
सिंदखेडराजा मतदार संघातून डॉ. राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटात गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता कोण? हे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु ती पोकळी दमदारपणे भरुन काढली मनोज देवानंद कायंदे (Manoj Devanand Kayande) या युवा नेत्याने. मनोजला राष्ट्रवादीत घेवून उमेदवारी देण्यासाठी जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी व प्रदेशचे नेते तुकाराम अंभोरे पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली. कायंदे यांच्या या प्रवेशामुळे सिंदखेडराजा मतदार संघात आता चुरस निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजीतदादा पवार गट हा महायुतीत असल्याने महायुतीचे उमेदवार मनोज कायंदे असल्याचे अॅड. नाझेर काझी यांनी सांगून, मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे त्यांचा पक्षप्रवेश करुन घेतला. यावेळी अॅड.काझी म्हणाले की, १९९९ पासून म्हणजेच राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून घड्याळ चिन्हावर सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवली जात आहे, आता तेच घड्याळ मनोज कायंदे यांना मिळाले असून त्या चिन्हावर मोठ्या मताधिक्क्याने ते निवडून येतील. सिं. राजा विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आम्ही ही निवडणूक मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार तथा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढवत आहोत. हा मतदार संघ राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा असल्यामुळे याची वेगळी ओळख राज्यात आहे. मनोज कायंदे (Manoj Devanand Kayande) यांच्या उमेदवारीमुळे युवक वर्गामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, सर्वधर्म समभाव जे देवानंदभाऊ सातत्याने जपत होते.. त्याचाच वारसा मनोज कायंदे चालवत असल्यामुळे जाती-पातीच्या पलीकडे जाऊन काम करणार्या मनोज कायंदे यांना मतदारांचा भरघोस पाठींबा मिळेल, व ही जागा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला विजय प्राप्त करुन देईल, असा विश्वास अॅड. नाझेर काझी यांनी व्यक्त केला.
यानंतर तहसिल कार्यालयात जाऊन विविध सामाजिक व राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत व महायुतीच्या पदाधिकार्यांच्या आशिर्वादाने मनोज कायंदे (Manoj Devanand Kayande) यांनी त्यांचा नामांकन अर्ज दाखल केला.
वडीलांच्या आठवणीने गहिवरला मनोज…
देवानंदभाऊ कायंदे यांचे महिनाभरापुर्वीच निधन झाले, त्या दु:खातून कायंदे परिवार अजूनही सावरला नसतांना.. या परिवारावर पुन्हा मोठी जबाबदारी यानिमित्ताने येऊन पडली. कायंदे परिवाराला राजकारणात आणण्यासाठी देवानंद भाऊंनी विकासात्मक माध्यमातून प्रयत्न केले. मात्र ते हयात नसतांना निवडणूक लढविण्याची वेळ आल्याने, उमेदवारी मिळाल्याच्या आनंदातही मनोज कायंदे (Manoj Devanand Kayande) वडीलांच्या आठवणीने याप्रसंगी भारावलेले दिसले.वडीलांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांनी नामांकन अर्ज दाखल केला!