देवेंद्र फडणवीस म्हणजे कोणत्या जाती किंवा धर्मसाठी लढणारा नेता नाही…
हिंगोली (Manoj Jarange Patil) : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणजे कोणत्या जाती किंवा धर्मसाठी लढणारा नेता नाही, त्यांचा लढा फक्त सत्तेसाठी असतो, स्वतःच्या सत्तेसाठी ते भारतीय जनता पक्षालाच संपवतील असे विधान मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले हिंगोलीत संवाद यात्रेसाठी आले असता ते पत्रकारांची बोलत होते.
मराठा समाजाच्या हितासाठी सर्व समाजाने मुंबईतील आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन!
29 ऑगस्ट रोजी मुंबईत होणार्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या तयारीसाठी सध्या मनोज जरांगे पाटील यांचे संवाद दौरे सुरू आहेत. यासाठी 16 ऑगस्ट रोजी हिंगोलीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईत होणारे आंदोलन हे मुंबई ठप्प करण्यासाठी नाही, तर मराठा समाजाच्या रास्त मागणीसाठी आहे, असे ते म्हणाले मुंबई तशीच अनेक कारणांनी अनेक वेळा टप्प होत असते, म्हणून हा ठपका मराठा समाजावर ठेवू नये असे ते म्हणाले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत येणार असल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘पोलीस पाहून घेतील’ असे दिलेले उत्तर चुकीचे असल्याचेही त्यांनी नोंदविले. या आंदोलनाची कल्पना 3 महिन्यांपूर्वीपासून देण्यात आली आहे. पोलिसांची धमकी देण्याऐवजी सरकारने (Govt) योग्य नियोजन करावे. आंदोलनकर्त्यांना रस्ता द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या आंदोलनात मराठा आंदोलकांना एक काठी जरी लागली, तरी होणार्या परिणामांना सरकार स्वतः जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला. देवेंद्र फडणवीस कोण्या जाती किंवा धर्मासाठी झटत नसून केवळ सत्तेसाठी झटतात असे आरोप करून मनोज जरांगे पाटील म्हणाले की, फडणवीसांनी एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार सारखे भाजपचे नेते संपविले. बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला, शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली, स्वाभिमानी शेतकरी संघटना संपवली. राज्यातीलच नाही, तर देशभरातील छोट्या पक्षांनी भारतीय जनता पक्षापासून सावध राहावे, असे सांगून देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षालाच एक दिवस संपवतील, असे विधान केले. गोव्यातील अधिवेशनात स्वतःला ओबीसी सांगून फडणवीस सर्वांचीच फसवणूक करीत असल्याचा आरोपही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला. मराठा समाजाच्या (Maratha Society) हितासाठी सर्व समाजाने मुंबईतील आंदोलनात (Movement) सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केले.
संवाद मेळाव्याला प्रतिसाद!
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोली शहराजवळील बळसोंड भागातील मधुर दिप मंगल कार्यालयात संवाद मेळाव्याचे आयोजन 16 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या मेळाव्याला जिल्हाभरातुन हजारोच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. या मेळाव्यात 29 ऑगस्टला काढण्यात येणार्या मोर्चा संदर्भात मनोज जरांगे यांनी आवाहन केले. तसेच समाजातील अन्य कोणत्याही अडचणी असल्यास त्या सुध्दा सांगितल्यास त्याची सुध्दा सोडवणुक करण्याकरीता निश्चित प्रयत्न होतील अशी ग्वाही दिली. या मेळाव्याला मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.




