मानोरा (Manora Mahavikas Aghadi) : येत्या विधान सभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) वतीने स्थानिक उमेदवार द्यावा, त्याचेच आम्ही काम करू, असे दिनांक ३० जून रोजी मासुपा कॉलेज येथे दुपारी ३ वाजता झालेल्या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले. महाविकास आघाडीचे वतीने निवडणूक लढविण्यास उत्सुक असणाऱ्या उमेदवारांची बैठक उत्साहात पार पडली. यावेळी पत्रकारांना माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अरविंद पाटील इंगोले म्हणाले की, स्थानिक उमेदवार वगळून बाहेरील उमेदवार लादला गेला तर (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीचा स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ता काम करणार नाही, असे बैठकीत एकमताने ठरले आहे, असे सांगितले.
स्थानिक उमेदवारीसाठी महविकास आघाडीची बैठक
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. ज्योतीताई गणेशपुरे, प्रदेश सरचिटणीस डॉ. शाम जाधव नाईक, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकिरड, उध्दव ठाकरे शिवसेनेचे अनिल राठोड, तालुका प्रमुख रवींद्र पवार, महंत सुनील महाराज, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बलदेव महाराज आदी उपस्थित होते. या वेळी सर्व मान्यवरांनी आपले मत मांडले. आणि येणाऱ्या कारंजा – मानोरा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कडून स्थानिक उमेदवार द्यावा, अशी मागणी पक्ष श्रेष्ठी कडे करणार असल्याचे सांगितले.
तालुक्यात बाहेरचे उमेदवार निवडणुकीच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम घेत आहेत. मात्र यांच्या कोणत्याही कार्यक्रमास (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीचे कोणतेही पदाधिकारी उपस्थित राहणार नाही असेही बैठकीत ठरले.