मानोरा(Washim):- तालुक्यातील बेलोरा, विठोली गव्हा, चाकोरा, हातोली, आसोला खुर्द या गाव खेड्यातील शेतकऱ्यांना पांदण रस्ता नादुरुस्त असल्याने शेतीचे माल व बी – बियाणे वाहतूक करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रलंबीत पांदण रस्त्यांच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी द्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा गट विकास अधिकारी यांना पंचायत समितीच्या सदस्या सौ. छाया राठोड यांनी दिला आहे.
महसूल प्रशासन ठोस कारवाई करत नाही
प्रलंबीत पांदण रस्ता प्रस्तावाच्या प्रकरणाला मंजुरी देणे संदर्भात पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत मुद्दा उपस्थित करूनही महसूल प्रशासन ठोस कारवाई (action) करत नाही. येत्या दि.२७ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत सभागृहाचा ठराव घेऊन याबाबत ठोस कार्यवाहीची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे करणार आहे. हातोली शिवारातील आसोला खुर्द ते भुली, गव्हा शिवारातील चाकुर ते बेलोरा, बेलोरा ते गलमगाव, गव्हा ते मानोरा, भुली ते चाकुर अशा अनेक वाहिवाटीच्या पांदण रस्त्याची अत्यंत वाईट दुरावस्था झालेली आहे. सदरील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सतत शेतकऱ्यांमधून होत असताना महसूल प्रशासन कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. या पांदण रस्त्यावरुन शेतकरीऱ्याना शेती वहीवाटीसाठी ये – जा करताना पावसाळ्यात मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही पांदण रस्ते एकमेव मार्ग असल्याने या रस्त्याने एक – दोन नाला व वळण येतात.
रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असल्याने पावसाने रस्त्यावर चिखल झालेला पावसाळ्यात दिसून येत आहे
रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असल्याने पावसाने रस्त्यावर चिखल झालेला पावसाळ्यात दिसून येत आहे. त्या रस्त्याने कापूस भरलेली बैलगाडी आणताना शेतकऱ्यांना नरकयातना भोगाव्या लागतात. तर पायी चालताना एक पाय टाका दुसरा काढा असा फसण्याचा कार्यक्रम या रस्त्यांवरुन शेतकऱ्यांना दररोज करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याने जाने अत्यंत जिकरीचे झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात बी – बियाणे घेऊन जाणे व शेतातून माल आणणे करीता एकमेव पांदन रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र एकीकडे शासन समृद्धी महामार्गासाठी मोठया प्रमाणात खर्च करत आहे. तर दुसरी कडे शेतकऱ्यांना पांदन रस्ते करून देण्यास शासन उदासीन का? हा आम्हा शेतकऱ्यांना न उलगडलेला कोड असल्याची सवेदनाही शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना शेती वहीवाटीसाठी शेतात सुलभतेने ये -जा कण्यासाठी तसेच बैलगाडी व ट्रॅक्टर नेण्या योग्य पांदन रस्त्याचे प्रश्र तातडीने लावण्यासाठी मानोरा तालुक्यातील पांदण रस्त्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याची मागणी केली आहे.