मुख्यमंत्री व वनमंत्री याजकडे चौकशीची मागणी!
मानोरा (Manora) : तालुक्यात वनविभाग मार्फत झालेल्या वन तलाव, तार कंपाऊंड, वाच टॉवर, जाळी बंधारे, सीमांकन सिमेंट पिलर, झाडे कटाई व रॉयल्टी आदी कामात वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदाराच्या संगनमतीने लाखो रुपयाचा भ्रष्ट्राचार (Corruption) करण्यात आला आहे. सदरील कामाची सखोल चौकशी (Inquiry) करून संबंधितांविरुद्ध कार्यवाही करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर (Collector’s Office) आंदोलन करण्याचा इशाऱ्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) व वन मंत्री गणेश नाईक यांना विजय कृष्णा राठोड यांनी पाठविले आहे.
वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून न्याय द्यावा!
निवेदनात नमूद केले आहे की, वन विभागामार्फत धोनी, पालोदी, रतनवाडी, पोहरादेवी, उमरी, फुलउमरी, मानोरा आदीसह इतर गावात करण्यात आली असुन अनेक गावातील कामे अर्धवट आहेत. वन विभागाने (Forest Department) वरील कामाची निविदा न काढता देवाण घेवाण करून मर्जीतल्या कंत्राटदाराला (Contractor) दिले आहे. सदरील कामे शासनाचे नियमाचे पालन न करता थातूरमातूर पद्धतीने जुन्याच कामाची रंगरंगोटी करून करण्यात आली आहे. तसेच वन तलावाला इनलेट, आऊटलेट लागणारी मुरूम व दगड विना रॉयल्टीचे वापरण्यात आले आहे. वन तलाव मजुराच्या सहाय्याने करणे आवश्यक असून देखील, जे सी बी मशीनच्या सहाय्याने कामे करण्यात आली आहे. त्यामुळे सदरील कामाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून न्याय द्यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन छेडण्याच्या इशाऱ्याचे तक्रार निवेदन (Complaint Statement) मुख्यमंत्री व वनमंत्री यांना पाठविले आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी, वनसंरक्षक प्रादेशिक यवतमाळ, उपवनसंरक्षक वाशिम, वन परिक्षेत्र अधिकारी (Forest Range Officer) यांना पाठविल्याचे निवेदनात नमूद केले आहे.