'रोजा' चित्रपटातील आजीच्या भूमिकेमुळे मिळाली होती विशेष ओळख; ४०० हून अधिक चित्रपट आणि अनेक मालिकांमधून गाजवली अभिनय कारकीर्द
मनोरंजनविश्वातून एक दुःखद वृत्त समोर आले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री वत्सला राजगोपाल यांचे गुरुवारी (३० ऑक्टोबर) निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. चेन्नई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीसह कुटुंबीयांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
वत्सला राजगोपाल यांचा जन्म १९३३ मध्ये तिरुवनंतपुरम येथे झाला होता. विशेष म्हणजे, त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. १९९२ मध्ये दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या 'रोजा' या गाजलेल्या चित्रपटातून त्यांना मोठी ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री मधूच्या आजीची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्या प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी वत्सला राजगोपाल चेन्नईतील अकाउंटंट जनरल कार्यालयात क्लर्क म्हणून कार्यरत होत्या. मात्र, बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. नोकरी करत असतानाही त्यांनी आपली अभिनयाची इच्छा जिवंत ठेवली आणि वयाच्या साठीनंतर मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले.
४०० हून अधिक चित्रपटांमध्ये केलं काम
दीर्घ अभिनय कारकिर्दीत वत्सला राजगोपाल यांनी ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. 'रोजा', 'धाम धूम', 'मोझी', 'साथी लीलावती', 'रिदम', 'विनर', 'पट्टियल', 'अनियन' आणि 'कल्याण समायल सादम' यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष उल्लेखनीय ठरल्या.
छोट्या पडद्यावरही उमटवली छाप
मोठ्या पडद्याबरोबरच वत्सला राजगोपाल यांनी दूरचित्रवाणी क्षेत्रातही आपले स्थान निर्माण केले होते. 'चिथी', 'आनंदम', 'कधई नेरम', 'मुंधनाई मुदिचु' आणि 'मगल' यांसारख्या दक्षिण भारतीय मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.
वयाच्या साठीनंतर अभिनय क्षेत्रात प्रवेश करून चारशेहून अधिक चित्रपट आणि अनेक मालिकांमध्ये काम करणाऱ्या वत्सला राजगोपाल यांच्या निधनाने मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्रीला मुकावे लागले आहे.