मानोरा(Washim):- येत्या अडीच महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा मतदार संघाच्या (Assembly constituencies)निवडणूकीसाठी महायुती व महाविकास आघाडीतील अनेक पुढारी यांच्यासह काही पदाधिकारी यांनी उमेदवारीसाठी भावी आमदारांनी उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. काही सामजिक कार्यकर्त्यांची सुध्दा निवडणूक लढण्याची इच्छा प्रबळ झाल्याने त्यांनी मतदारसंघात विविध उपक्रम राबवून जोरदार तयारी सुरू केली आहे.
विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटण्याची दाट शक्यता
जशी जशी विधानसभा निवडणुक जवळ जवळ येत आहे, तसतसे इच्छूक भावी उमेदवारांना आमदारकीचे स्वप्न पडत आहेत. काही पुढारी समाजमध्यामातून आपण निवडणुकीसाठी इच्छूक असल्याचा प्रचार प्रसार करत आहेत. तर काही जिल्हा परिषद(Zilla Parishad), पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत सामान्य कार्यकर्त्यांकडून दारुण पराभव पत्करलेल्या पुढाऱ्यांना आमदार झाल्यासारखे वाटत आहे. एका दोघांच्या लढाईत आपले काही जमते का ? याची अनेक जण चाचपणी करतांना दिसत आहे. अशातच निवडणूक तोंडावर आली की इच्छुकांचे लक्ष्मी दर्शनाचे पिक हमखास येते. महविकास आघाडीत हमखास कारंजा – मानोरा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाला सुटण्याची दाट शक्यता आहे, मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते उबाठा गटाला सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आतापर्यंत बाहेरील उमेदवार निवडणूकीत विजयी
महायुतीत भाजपकडेच हा मतदार संघ राहणार आहे. मागील दोन टर्म पासून या मतदार संघात स्व. आमदार राजेंद्र पाटणी हे भाजपाचे आमदार राहिलेले आहे. आता त्यांचे निधन झाल्याने त्यांचे चिरंजीव ज्ञायक पाटणी या मतदार संघात निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्याचबरोबर भाजपाकडून राजू राजे पाटील, महंत जितेंद्र महाराज, भक्तराज राठोड महाराज यांची निवडणूक लढण्याची तयारी दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अरविंद पाटील इंगोले, भोजराज चव्हाण, बाबूसिंग नाईक, ज्योतीताई गणेशपुरे, डॉ श्याम जाधव हे निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याची माहिती आहे. उबाठा गटाकडून अनिल राठोड, डॉ सुभाष राठोड, रविंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून युसुफ पुंजानी, चंद्रकांत ठाकरे, काँग्रेसकडून देवानंद पवार, शिंदे गटाकडून डॉ महेश चव्हाण, वंचित आघाडीकडून अभिजीत राठोड तर अपक्ष म्हणून प्रणित मोरे आदींनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. मतदार संघात स्व. प्रकाश डहाके वगळता आतापर्यंत बाहेरील उमेदवार निवडणूकीत विजयी झालेला आहे. यावेळी सुध्दा बाहेरचाच उमेदवार निवडणूकीत विजयी झेंडा फडकविणार असे जनतेतून बोलले जात आहे.