आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस!
मुंबई (Marathi Language) : महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावणारी ही मोठी बातमी आहे. महाराष्ट्रासाठी जनतेसाठी हा ऐतिहासिक दिवस ठरला आहे. मराठी (Marathi Language) भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला असून, केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजूरी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे.
मराठी भाषेसोबत पाली, प्राकृत, असमिया आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. यापूर्वी तामिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्यालम, ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता.
अभिजात भाषा म्हणजे भारत सरकारकडून वैशिष्ट्यपूर्ण भाषेला दिला जाणारा एक दर्जा आहे. हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो, त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारतर्फे अनुदान देण्यात येते.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. फडणवीस म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (PM Modi) आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे मनापासून आभार मानतो. यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेण्यात आला. मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे हातभार लागले. मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मराठी भाषेला मिळालेला हा बहुमान सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील मराठी जनतेचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र सरकारकडून सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.