महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे अध्यक्ष भगवानराव देशमुख यांची माहिती
हिंगोली (Anganwadi Worker Samiti) : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फ विविध मागण्या संदर्भात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा व आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी दिली. तसेच या संदर्भात महिला व बालविकास विभागाच्या सचिव यांना निवेदन देण्यात आले आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका (Anganwadi Worker Samiti) व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी सांगितले कि, शासनाने दिलेले मोबाईल फोन, सिमकार्ड व डेटा रिचार्ज मध्ये एफ.आर.एस. चे काम होत नाही. त्यामुळे चांगल्या क्षमतेचे महाग मोबाईल फोन स्वतः अंगणवाडी सेविका विकत घेऊन त्यात स्वतःचे सिमकार्ड घालुन स्वतःच्या खर्चाने डेटा रिचार्ज करुन एफ. आर. एस. करण्याची जबरदस्ती अंगणवाडी सेविकांना केली जाते. असे करुनही लाभार्थ्याकडे मोबाईल फोन नसणे, आधार जोडणी नसणे किंवा ओटीपी देण्याची असमर्थता, आदी समस्यांमुळे एफ. आर. एस. होऊ न शकल्यास अंगणवाडी सेविकांना मानधनात कपात करण्याची आणि लाभार्थ्यांचा आहार बंद करण्याची धमकी दिली जाते.
लाभार्थ्यांचा आहार बंद करणे हा अन्न सुरक्षा कायदयाचा भंग असुन त्याबाबत कोणी तक्रार केल्यास (Anganwadi Worker Samiti) अंगणवाडी सेविकांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाभार्थ्यांचे एफ. आर. एस. होत नाही म्हणुन लाभार्थ्याला आहारापासुन वंचित ठेवु नये. नेटवर्क किंवा ओटीपी न मिळाल्यामुळे एफ. आर. एस. चे काम होत नाही. त्यासाठी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येऊ नये, अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर अँपचे संपुर्ण प्रशिक्षण त्यांना जोपर्यंत चांगल्या पद्धतीने समजत नाही तोपर्यंत दयावे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे काम करण्याची सक्ती करण्यात येत आहे. इतर कामे लावल्यामुळे अंगणवाडीच्या मुळ कामावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. पुर्वी प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही आरोग्य खात्याकडे होती. आशा स्वयंसेविका योग्य प्रकारे काम करत होत्या.
त्यामुळे सदरील योजना ही आरोग्य विभागाकडेच ठेवण्यात यावी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेच्या पात्रता, अपात्रता निकषाच्या अनुषंगाने लाभार्थी तपासणी करण्याचे सर्व्हेक्षण अंगणवाडी सेविकांना लावण्यात येत आहे. या सर्व्हेक्षणात एखादी लाडकी बहीण अपात्र झाल्यास ती लाडकी बहीण व तिच्या घरच्या मंडळीसोबत कायमची वैर भावना निर्माण होईल. तसेच अंगणवाडी सेविकेला गावात किंवा शहरात काम करणे कठिण होईल.
भविष्यकाळात याचा राग मनात धरुन (Anganwadi Worker Samiti) अंगणवाडी केंद्रात राजकारण सुदधा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा विचार करुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचे फेर सर्व्हेक्षण करण्याचे काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येवु नये. सदर कामावर अंगणवाडी सेविका बहिष्कार घालत आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येवु नये. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्ती नंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी. ही मागणी प्रलंबित आहे. यासह विविध मागण्यांचा यात समावेश असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी सांगितले.