परभणी (Parbhani):- शहरात न्यायालयीन कोठडीतील सोमनाथ सुर्यवंशी या युवकाचा रविवारी पहाटे मृत्यू (Death)झाला. या घटनेच्या निषेधार्थ सोमवार १६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जिल्हाभरात बंद शांततेत
परभणी शहरात १० डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्याचा प्रकार घडला. ११ डिसेंबर रोजी घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सुरु असताना दगडफेक, जाळपोळ झाली. पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात अनेक जण गंभीर झाले. यानंतर पोलिसांनी कोम्बींग ऑपरेशन करुन निरपराध लोकांना ताब्यात घेतले. न्यायालयीन कोठडीत असलेल्या शंकर नगरातील रहिवाशी तथा विधी शाखेचा विद्यार्थी सोमनाथ सुर्यवंशी यांचा रविवार १५ डिसेंबर रोजी पहाटे मृत्यू झाला. संभाजी नगर येथे त्यांच्या पार्थिवाचे शवचिच्छेदन (Autopsy) करण्यात आले. दरम्यान या घटनेचे पडसाद राज्यात उमटले असून सोमवार १६ डिसेंबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक आंबेडकरी संघटनांनी दिली. या बंदमध्ये परभणी शहरातील आंबेडकरी संघटनांनी सहभाग घेत बंदचे आवाहन केले होते. सोमवारी दुपारपर्यंत सर्व बाजारपेठ बंद होती. रस्त्यावरही फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे सर्वत्र बंद शांततापूर्ण वातावरणात कडकडीत पाळण्यात आला.