लातूर (Latur):- परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना तसेच न्यायालयीन कोठडीतील आंबेडकरी अनुयायीच्या मृत्यूच्या घटनेचे तीव्र पडसाद लातूरमध्ये उमटले. संविधान प्रतिकृती विटंबनेच्या निषेधार्थ तसेच न्यायालयीन कोठडीत मृत्यू (Deaths)पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या घटनेच्या निषेधार्थ लातूरमध्ये सोमवारी आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले. आंबेडकरी अनुयायांनी केलेल्या आवाहनानुसार लातूर शहर तसेच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या बंदमुळे लातूर शहरातील जवळपास 100 कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
परभणीतील घटनांच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायी उतरले रस्त्यावर!
परभणी येथे 10 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी व संविधानावादी नागरिक रस्त्यावर उतरले. त्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून शहरातील निराभराग लोकांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) असलेला विधी शाखेचा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. या घटनांच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायींनी व संविधानवादी नागरिकांनी व पक्ष-संघटनांनी सोमवारी महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्या आवाहनाला प्रतिसाद देत लातूरमध्ये आंबेडकरी यांनी भंते पय्यानंद यांच्या नेतृत्वाखाली बंदचे आवाहन केले होते.
सोमवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येत आंबेडकरी अनुयायींनी व संविधानवादी नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करीत परभणी येथील घटनांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर शहरातील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. लातूर शहरातील गंजगोलाई तसेच गोलाईतून जाणाऱ्या सराफ लाईन, लोखंड गल्ली, कापड गल्ली, भुसार लाईन, मजिद रोड, शिवाजी रोड, सुभाष चौक, हत्तेनगर काॕर्नर या सगळ्या भागात व्यापाऱ्यांनी उस्फूर्त बंद पाळला.
लातूर आडत बाजार
गुळ मार्केट, महात्मा फुले भाजी मार्केट, कव्हा रोड यासह शहरातील इतर भागातही व्यापाऱ्यांनी बंद पाळला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, राजीव गांधी चौक, महात्मा बसवेश्वर चौक, बाभळगाव नाका, नवा व जुना रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, औसा रोड, बार्शी रोड, पाच नंबर चौक, एक नंबर चौक, दयानंद गेट यासह शहराच्या सर्व भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. सोमवारी दुपारपर्यंत सर्व बाजारपेठ बंद होती. रस्त्यावरही फारशी वर्दळ नव्हती. सर्वत्र शांततापूर्ण वातावरणात कडकडीत पाळण्यात आला. जागोजागी चोख पोलीस बंदोबस्त; जिल्हाभरात बंद शांततेत