Pandharkawda :- तालुक्यातील कवठा (वार्हा) येथील खुनी नदीच्या पात्रातुन रेतीचा (Sand) बेसुमार उपसा सुरु आहे. या रेतीच्या उपस्याबाबत गावकर्यांनी तहसिलदारांकडे लेखी व तोंडी व तक्रारी सुध्दा केलेल्या आहे. मात्र तरी सुध्दा महसुल प्रशासन या रेतीच्या उपस्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकर्यातुन रोष व्यक्त करण्यात येत आहे.
गावकर्यांच्या तक्रारीकडे तहसिलदाराचे दुर्लक्ष
या रेतीच्या उपस्यामुळे पर्यावरणाचा समतोल सुध्दा बिघडत चालला आहे. केळापुर तालुक्यात टिपेश्वर अभयारण्य आहे. या अभयारण्यातील प्राण्यांच्या संरक्षणाकरीता तथा पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणुन राज्य शासनाने गेल्या अनेक वर्षाआधी पाटणबोरी व परिसरातील सर्व स्ट्रोन क्रशर(Straw crusher) बंद केले. तर गेल्या दहा वर्षापासुन तालुक्यातील रेतीचा घाटांचा लिलाव बंद केला आहे. रेती घाटांचा लिलाव बंद जरी करण्यात आला असला तरी येथील तहसिलदार व संधीसाधु मंडळ अधिकारी तथा तलाठ्यांच्या आर्शिवादाने तालुक्यातील नदी नाल्यातुन रेतीचा उपसा सुरु आहे.
खुनी नदीच्या पात्रातुन मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा
रेतीचा उपसा करुन त्याची विक्री करण्यासह काही राजकीय नेते मंडळी आपल्याच शेतात त्या रेतीची साठवणुक सुध्दा करुन ठेवत आहे. हा सर्व प्रकार महसुलचे वरिष्ठ अधिकारी उघड्या डोळ्याने पाहत आहे. कार्यवाहीच्या नावावर एक, दोन लहान मॅक्स पिकअप वाहनावर कार्यवाही करुन तहसिलदार व त्यांच्या चौकडीतील कर्मचारी आर्थीक तुंबड्या भरीत असल्याचा आरोपही नागरिक करीत आहे. तालुक्यातील कवठा (वार्हा) येथील खुनी नदीच्या पात्रातुन मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरु आहे. रेतीची वाहतुक करण्याकरीता तस्करांनी चक्क नदीमध्ये रस्ता तयार केलेला आहे. त्यांच्या तक्रारी सुध्दा गावकर्यांनी तहसिलदाराकडे तोंडी व लेखी स्वरुपात केल्याची माहिती गावातील माधव डंभारे यांनी दिली आहे. तरी सुध्दा तहसिलदार रेती तस्करांवर कार्यवाही करण्यास धजावत नाही याला म्हणावे?
रेती तस्कर व तस्करीबाबत तहसिलदार यांना पुर्ण कल्पना असुन सुध्दा ते केवळ आपल्या आर्थीक स्वार्थाकरीता शासनाने नुकसान करीत असल्याचा आरोप गावकरी करीत आहे. येथे आयएएस दर्जाचे उपविभागीय महसुल अधिकारी कार्यरत असतांना सुध्दा तहसिलदार रेती तस्करांना पाठीशी घालत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. उपविभागीय अधिकार्यांनी रेती तस्करांवर कार्यवाही करण्याकरीता आपली स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वयीत करुन रेती तस्करांना पाठीशी घालणार्या तहसिलदार व त्यांच्या चौकडीतील दोषीवर कठोर कार्यवाही प्रस्तावित करण्याची मागणी कवठा (वार्हा) गावातील नागरिक करीत आहे.
