शासनाकडे हजार पानांचा प्रस्ताव सादर
अधिसूचना निघताच लिलाव प्रक्रिया
मानोरा (Mastermind Praneet More) : यवतमाळ दिग्रस येथील बहुचर्चित जनसंघर्ष अर्बन निधीतील ४९ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात अखेर शासनाने प्रणित मोरे यांच्या ४ कोटी ३६ लाखांच्या २१ मालमत्ता रडारवर घेतल्या आहे. गृह विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे अधिसूचनेसाठी एक हजार पानांचा प्रस्ताव एसआयटीने पाठविला आहे. अधिसूचना निघताच मालमत्ता लिलावाची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली आहे.
जनसंघर्ष अर्बन निधीतील गैरव्यवहाराचा (Mastermind Praneet More) मास्टरमाईंड प्रणित मोरे आणि संचालक मंडळाने संगनमत करून ६ हजार २०० खातेदारांच्या ४९ कोटींच्या ठेवीवर डल्ला मारला. दिग्रस पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली. एसआयटीने तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपीविरुद्ध ५ हजार ७७३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.
तसेच अपहाराच्या रकमेतून प्रणित मोरे (Mastermind Praneet More) याने २१ मालमत्ता खरेदी-विक्री केल्याची बाबही तपासात निष्पन्न केली आहे . या संपूर्ण मालमत्तेचे मूल्यांकन करण्यात आले असून यामध्ये सदर मालमत्ता ४ कोटी ३६ लाखांची असल्याचे स्पष्ट झाले आहे . त्यानंतर एसआयटीने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना अहवाल सादर केला. २१ मालमत्तेची अधिसूचना काढण्यासाठी गृह विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेचे अपर पोलिस महासंचालक यांच्याकडे एक हजार पानांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
शासनाकडून आता अधिसूचना कधी निघते, याकडे खातेदारांचे लक्ष लागले आहे. प्रणित मोरे (Mastermind Praneet More) प्रमाणेच साहील जयस्वाल याच्या मालमत्तेवरही एसआयटीकडून फोकस करण्यात आला आहे. प्रणितच्या मालमत्तेची अधिसूचना निघताच साहीलच्याही मालमतेचा प्रस्ताव पाठविला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्रणित मोरे याच्या एकूण २१ मालमत्ता रेकॉर्डवर घेण्यात आल्या आहे. मालमत्तेची अधिसूचना काढण्यासंबंधी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.