अमरावती (Social Work Educators) : राज्यातील उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील समाजकार्य महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एच टी ई सेवार्थ प्रणाली द्वारे ऑनलाईन पद्धतीने वेतन, सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा लाभ, एनपीएस व जी पी एफ ची खाती उघडावी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावी आदी विविध मागण्यांकरिता सह संचालक, उच्च शिक्षण कार्यालयावर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मास्वे) संघटनेतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अंबादास मोहिते यांचे निर्देशानुसार राज्यातील सर्व विभागात एकाच दिवशी करण्यात आलेल्या या (Social Work Educators) आंदोलनात सह संचालक,उच्च शिक्षण अमरावती विभागीय कार्यालयातील सह संचालक डॉ. अभय खांबोरकर, प्रशासनिक अधिकारी, डॉ. दवणे, डॉ. राठोड, अधीक्षक, यांचेसह सर्व कर्मचाऱ्यांना संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत, गुलाब पुष्प वृक्ष रोपटे, तिळगुळ देऊन नव वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर प्रास्ताविकेचे सामुहिकरीत्या वाचन करण्यात आले.
ज्यात सह संचालकांसह कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आणि (Social Work Educators) समाजकार्य महाविद्यालयीन प्रतिनिधींनी सहभाग घेतला. कोणत्याही कार्यालयातील फक्त वरिष्ठांचा सत्कार, सन्मान केला जातो, सर्वात कनिष्ठ कर्मचाऱ्याला सहसा उपेक्षेची वागणूक मिळते. या पार्श्वभूमीवर “मास्वे” तर्फे सह संचालक कार्यालयातील सर्व शिपाई बंधु चे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. “भारताचे संविधान…आमचा सन्मान”, “वुई वॉन्ट जस्टिस”, “संविधानाचा करा सन्मान….राखा कर्तव्याचे भान”, “जिंदाबाद जिंदाबाद….मास्वे जिंदाबाद”, “नहीं सहेंगे, नहीं सहेंगे…भेदभाव, अन्याय नहीं सहेंगे” आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
सह संचालक डॉ. अभय खांबोरकर यांना डॉ. राजेंद्र सिंह दीक्षित, डॉ. तुळशीराम राठोड, डॉ. दिलीप काळे, डॉ. अशोक ठाकरे व समाजकार्य महाविद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन दिले. व त्यावर चर्चा करण्यात आली. आणि मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. सह संचालक डॉ.अभय खांबोरकर यांनी त्यांच्या कार्यालय स्तरावरील मागण्यांची तातडीने पूर्तता करण्यात येईल व शासन स्तरावरील मागण्यांबाबत आजच शासनाला कळविण्यात येईल व पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे आश्वासन दिले.
या (Social Work Educators) आंदोलनात अमरावती विभागातील बुलढाणा, मलकापूर, वाशिम, अकोला, पुसद, यवतमाळ, अमरावती येथील समाजकार्य महाविद्यालयांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येत उपस्थित होते. या आंदोलनाच्या यशस्वितेकरिता अमरावती विभागातील सर्व समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल सर्व प्रतिनिधींचे आणि सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल सहसंचालकांचे डॉ.राजेंद्र सिंह दीक्षित यांनी आभार मानले. सहसंचालक कार्यालयात “मास्वे” च्या गांधीगिरीची चर्चा होती.




