नागपूर (Mayo Hospital) : कोलकात्याच्या निवासी डॉक्टर महिलेवरील क्रूर अत्याचाराच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आज संपाच्या दहाव्या दिवशी अभिनव गांधीगिरी आंदोलन केले. (Mayo Hospital) मेयोच्या डॉक्टरांनी रस्त्यावर ‘ओप्प्रीडी’ थाटून दीडशेवर रुग्णांना तपासले डॉक्टराच्या या अभिनव आंदोलनामुळे रुग्ण चांगलेच सुखावले.
नागपूरच्या मेडिकल व (Mayo Hospital) मेयो मधील जवळपास ८०० हून अधिक डॉक्टर संपात सहभागी आहेत. १३ ऑगस्टपासून संप सुरू असतानाही सरकारकडून अद्यापही तोडगा निघाला नाही. परिणामी, रुग्णांना याचा मोठा फटका बसत आहे. शासकीय रुग्णालयाचा कणा असलेले निवासी, इन्टर्न व वरिष्ठ निवासी डॉक्टर ओपीडी, नियोजित शस्त्रक्रिया, वॉर्ड व नमुने तपासण्यांच्या कार्यात नसल्याने मोजक्याच डॉक्टरांच्या खांद्यावर रुग्णांची जबाबदारी आली आहे. परिणामी, उपचारात उशीर होत असल्याचे चित्र आहे. केवळ गंमीर रुग्ण भरेती करून घेतले जात आहेत. किरकोळ शस्त्रक्रिया कमी झाल्या आहेत. अनेक रुग्णांना पदरमोड करून खाजगी रुग्णालयांत जावे लागत आहे. गुरुवारी ‘मेयो’च्या डॉक्टरांनी रस्त्यावर ‘ओपीडी’ लावून रुग्ण तपासले.
‘मेयो’चे ‘मार्ड’ संघटनेचे अध्यक्ष डॉ. बालगंगाधर द्विडमुठे यांच्यासह उपाध्यक्ष डॉ. श्रेया, डॉ. पूजा सई, डॉ. नयन राजशेखर व डॉ. सामी यांच्या पुढाकारात रुग्णालयाच्या रस्त्यावर गुरुवारी ‘ओपीडी’ चालविण्यात आली. मेयो, (Mayo Hospital) मेडिकलमध्ये इतर दिवशी ओपीडीमध्ये दीड ते अडीच हजार रुग्ण उपचारासाठी येतात. संपाच्या काळात रुग्णांची ही गर्दी फारशी कमी झाली नाही. मात्र, वॉर्ड सांभाळणारे निवासी डॉक्टरच नसल्याने भरती रुग्णांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे वॉर्ड अर्धे रिकामे झाल्याचे दिसून येत होते, असे सुत्रांनी सांगितले.