राज्यातील ४० उद्योजक आणि २० उद्योगक्षेत्रातील संघटना झाल्या सहभागी
मुंबई: ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी’ आज ४० विविध क्षेत्रातील उद्योजक तसेच २० विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या खाजगी उद्योजकांच्या संघाटनांच्या प्रतिनिधीनी सहभाग घेतला. त्यांच्याशी कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी संवाद साधला. कौशल्य विकास विभागामार्फत रोजगार देणा-या विविध आस्थापना,युवा आणि शासन यांच्या उत्तम समन्वय साधला जाईल.योजना महाराष्ट्र राज्याच्या विकासात योगदान देवून अमुलाग्र बदल घडवेल असे मंत्री लोढा म्हणाले. या योजनेमुळे दरवर्षी १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणार असून कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करेल असे मत लोढा यांनी व्यक्त केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी’ खाजगी क्षेत्रातील उद्योजकांनी रोजगाराची मागणी नोंदविण्यासाठी ही ‘उद्योजकांशी संवाद’ सभा आयोजित केली होती. या बैठकीत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील,आयुक्त निधी चौधरी उपस्थित होत्या. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचे मुख्यमंत्री कार्यालयाचे व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे नोडल अधिकारी ह्षीकेश हुंबे यासह राज्यातील ४० उद्योजक आणि २० उद्योगक्षेत्रातील विविध संघटना यावेळी उपस्थित होत्या.
राज्याला विकासाकडे नेणारी ही योजना असून भेदभावापलीकडे जावून सर्वांसाठी ही योजना आहे,उत्पन्नाची कोणतीही अट या योजनेसाठी नाही अशी ही योजना राबवली जाणार आहे.रोजगार निर्माण करणे या एकाच ध्येयापुढे सर्वांनी काम करण्यासाठी एकत्र या.आई-वडील आपल्या मुलांना चांगली नोकरी लागावी यासाठी खूप कष्ट घेत असतात.युवांकडे चांगली पदवी असूनही आपल्या पाल्याला चांगली नोकरी नसेल तर पालक आणि पाल्य दोघेही निराश होतात. त्याचवेळी उद्योजक व विविध खाजगी आस्थापना कुशल मनुष्यबळ नाही म्हणून खंत व्यक्त करत असतात हे लक्षात घेवून सर्वांनी एकत्र येवून राज्याच्या विकासात योगदान देणारी प्रत्येकाचा वैयक्तीक विकास करणारी ही योजना प्रभावीपणे राबवूयात असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.