काँग्रेससाठी नियतीचीच मोठी मदत; ‘घड्याळा’च्या संसर्गाने भाजपा पीडित!
महादेव कुंभार
लातूर (Ajit Pawar) : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात सध्या महायुतीचे चार आमदार असून काँग्रेसचे दोनच आमदार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून या वाऱ्यामध्ये जिल्ह्यात अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री ‘डेंजर झोन’मध्ये आहेत. दुसरीकडे काँग्रेससाठी मात्र नियतीचीच मोठी मदत होत असून भाजपा मात्र घड्याळाच्या संसर्गाने पीडित झाल्याचे दिसत आहे.
लातूर शहर, लातूर ग्रामीण या दोन मतदारसंघात अनुक्रमे दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) व धिरज देशमुख हे विद्यमान आमदार असून सध्यातरी त्यांच्यासमोर तगड्या स्पर्धकाचे नाव दिसून येत नाही. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या स्नुषा डाॕ. अर्चना पाटील यांना भाजपाने उमेदवारी दिली तर लातूर शहरात लढत रंगू शकते. ग्रामीणची जागा महायुतीत शिंदे सेनेकडे असून तेथे अद्याप चेहरा समोर आला नाही. काँग्रेससाठी नियतीचीच मोठी मदत म्हणावी लागेल.
उदगीर मतदारसंघात अजितदादांचे मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) हे सध्यातरी ‘डेंजर झोन’मध्ये आहेत. कारण थोरल्या पवारांनी तेथे भाजपाचे लढवय्ये माजी आमदार सुधाकर भालेराव यांंच्याकडे तुतारी दिली आहे. शिवाय देशमुख काँग्रेस आणि कमळनिष्ठ भाजपाचे पहिले ‘टार्गेट’ राज्याचे क्रीडामंत्री आहेत. अहमदपूर मतदारसंघातही ‘ग्रेट मराठा’ लढत होणार असून अजितदादांचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांनी लोकसभेत ‘पंजा’ला केलेली मदत ‘जिव्हारी’ लागलेले कमळनिष्ठ भाजपावाले व्याजासह वसूल करण्यासाठी ‘मिशी’वर पीळ देवून तयार आहेत. थोरल्या पवारांनी भाजपाचे गतवेळचे पराभूत उमेदवार माजी राज्यमंत्री विनायक पाटलांकडे तुतारी दिली आहे, ते स्व:प्राणानाने ‘फुंकतील’ का? हा भाग वेगळा.
निलंगा मतदारसंघ लोकसभेला काँग्रेसकडे झुकला. भाजपाचे माजीमंत्री संभाजीराव पाटील (Sambhajirao Patil) यांच्या विरोधात तेथे ‘नुरा कुस्ती’चाच प्रयोग अपेक्षित आहे. मात्र काँग्रेसने ‘सिरियस’ घेतल्यास संभाजीरावांना मैदान सोपे राहणार नाही. (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री फडणवीसांचे ‘जीवश्च-कंठश्च’ औशाचे भाजपा आ. अभिमन्यू पवार यांना यावेळी बहुधा उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचे तगडे आव्हान राहणार आहे. शिवाय (Maratha Reservation) मराठा आरक्षणवाद्यांचे ते जिल्ह्यातील ‘टाॕपर टार्गेट’ आहेत. यामुळे ‘चक्रव्यूह’ भेदण्यासाठी त्यांना यावेळी ‘ताकद’ कोण देणार? यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.