नागरिकांनी आपल्या तक्रारी हेल्पलाईनवर द्याव्यात
देशोन्नती वृत्तसंकलन
यवतमाळ (MLA Amol Mitkari) : राज्यातील शासकीय योजनांसंदर्भात कुठल्याही अडचणी तथा तक्रारी असल्यास त्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादीने हेल्पलाईन सुरु केली आहे. ९८६१७१७१७१ हा हेल्पलाईन क्रमांक असून सदर क्रमांकावर नागरिकांनी तक्रार दाखल केल्यानंतर चॅटबॉटच्या माध्यमातून तक्रारीचे निकारण केले जाणार आहे.
याबाबतची माहिती देण्याकरिता आज विश्रामभवन येथे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आ. अमोल मिटकरी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विचारलेल्या प्रश्नांमध्ये आम्ही महायुतीचे घटक पक्ष असलो तरी प्रत्येकाची विचारधारा स्वतंत्र आहे. महायुतीमध्ये कुठल्याही घटक पक्षाने एकमेकांना त्याच्या विचारधारा बदलविण्याबाबत सक्ती केली नसून आमची विचारधारा ही पुरोगामीत्वाची आहे आणि ती पुरोगामीत्वाचीच राहणार असल्याचे स्पष्ट मत आ. अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केले.
महायुतीकडे जनकल्याणाच्या योजना राबविल्या जात असल्याने, विरोधकांकडून निवडणुकीनंतर योजना बंद होण्याच्या खोटा प्रचार केवळ राजकीय व्देषातून केला जात आहे. अर्थमंत्री अजीत पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील दहावा अर्थसंकल्प नुकताच सादर केला असून त्यात समाजातील सर्वच घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. सदर योजनांची माहिती जनसामान्यांना व्हावी तसेच त्यांच्या योजनेसंदर्भात काही तक्रारी व अडचणी असल्यास त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हेल्पलाईनच्या माध्यमातून पक्षापर्यंत कळवाव्यात, त्यानंतर स्थानिक पातळीवरील अडचणी तेथील स्तरावरच सोडविण्यात येतील. तेव्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत महायुतीतील सहकारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्या नियोजीत हेल्पलाईन क्रमांकावर मांडण्याचे आवाहन आ. अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी पत्रकार परिषदेतून केले. यावेळी तारीक लोखंडवाला, वसंतराव घुईखेडकर, क्रांती थोटे (राऊत) लालजी राऊत व इतर उपस्थित होते.
राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादीची आमनेसामने नारेबाजी
आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठक विश्राम भवन येथे आयोजीत होती. त्यामुळे जिल्हा अध्यक्ष प्रा. वर्षा निकम यांच्यासह त्यांचे पदाधिकारी परिसरामध्ये उपस्थित होते. त्याचा कालावधीमध्ये राष्ट्रवादी अजीत पवार पक्षांचे आ. अमोल मिटकरी हे पत्रकार परिषदेसाठी विश्रामभवन येथे दाखल झाले. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून त्यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली तर आ. मिटकरी (MLA Amol Mitkari) समर्थकांनीही नारेबाजीला नारेबाजीने उत्तर दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.