अचलपूर मतदार संघासाठी सर्वाधिक २४८ कोटींचा निधी मंजूर
अमरावती (MLA Bachu Kadu) : शेतकरी ,शेतमजूर व दिव्यांगांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हितासाठी झटत सर्वतोपरी कार्य करणारे अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष, शेतकरी नेते बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास मोठे यश मिळाले असून अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील गारपीट व अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार आहे. राज्य सरकारने अमरावती जिल्ह्यातील अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यासाठी सर्वाधिक २४८ कोटीचा निधी मंजूर केला असून आर्थिक दृष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मार्च व एप्रिल 2024 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन आर्थिक गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसून ते संकटात सापडले होते. या अवकाळीचा सर्वाधिक फटका अचलपूर विधानसभा मतदारसंघातील अचलपूर व चांदूरबाजार तालुक्याला बसला होता.ही गंभीर परिस्थिती बघता आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात झालेल्या नुकसानीचा आढावा घेत शेतकऱ्यांना धीर दिला आणि राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करीत पाठपुरावा केला.
मार्च -एप्रिल 2024 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे अचलपूर मतदार संघातील अचलपूर व चांदूरबाजार या दोन तालुक्यातील जीरायत ,बागायत व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी अगोदरच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी पुरता हवालदिल झाला असून प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करीत सादर केलेल्या अहवालावरून तत्काळ निधी उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी एका पत्राद्वारे राज्य सरकारकडे केली होती. सोबतच त्या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा देखील केला.
त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येऊन 23 जुलै 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसान भरपाई पोटी देण्यात येणाऱ्या निधीस मंजुरी प्रदान करण्यात आली आणि तसा शासन आदेश 2 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आला. आ .बच्चू कडू यांच्या प्रयत्नामुळे नुकसान भरपाई पोटी अचलपूर मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी १५४.७८ कोटी रुपये व नव्याने यामध्ये वाढ करून अचलपूर तालुक्यासाठी 33 कोटी 98 लाख 4हजार 270 रुपये तर चांदूरबाजार तालुक्यासाठी 59 कोटी 76 लाख 62 हजार 280 रुपये असा एकूण 93 कोटी 74 लाख 66 हजार 550 रुपयांचा सर्वाधिक निधी मंजूर झाला आहे.
संकटग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला दिलासा -आ. कडू
जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज विविध संकटामुळे आर्थिक गर्तेत सापडला असून मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला होता. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या माध्यमातून थोडा आर्थिक दिलासा मिळावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळाले असून सरकारने अचलपूर मतदारसंघातील अचलपूर व चांदूरबाजार या दोन तालुक्यास सर्वाधिक २४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नुकसान भरपाई पोटी मिळणाऱ्या निधीमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होई ना दिलासा मिळणार असून लवकरच निधी वाटपास प्रारंभ होणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी दिली.