हिंगोली (Manoj Jarange Patil) : येथील विधानसभेची जागा शिवसेना उबाठाला गेल्यानंतर अपक्ष निवडणुकीची तयारी करीत असलेल्या माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी शनिवारी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
महाविकास आघाडी अंतर्गत हिंगोलीची जागा काँग्रेस पक्षाकडेच राहील असा प्रारंभी पासून अंदाज होता. पक्षात या उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा होती. अशात अचानक हिंगोलीची जागा शिवसेनेने घेतली. यामुळे जिल्ह्यातील एकाही विधानसभा मतदार संघात काँग्रेसला प्रतिनिधीत्व राहिले नाही. हा निर्णय झाल्यानंतर गोरेगावकर समर्थकांनी हिंगोलीत एक मोठी बैठक घेतली. या बैठकीत भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असा आग्रह केला. गोरेगावकरांनी उमेदवारी अर्ज यापूर्वीच दाखल केला आहे. त्यातच शनिवारी गोरेगावकरांनी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली.या भेटीतील चर्चेची माहिती समजली नसली तरी यातून राजकीय संदेश मात्र स्पष्ट झळकत आहे.
मुलाखती दिलेल्यामध्ये माजी आ. गोरेगावकरांचा समावेश नव्हता
विधानसभा निवडणूक निमित्ताने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडे १८ इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती. त्यावेळी गोरेगावकरांना काँग्रेसच्या तिकीटाबाबत खात्री होती; परंतु जागा उबाठा सेनेला सुटल्याने त्यांनी पावित्रा घेतला आहे.