हिंगोली (MLA Bhaurao Patil) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर (MLA Bhaurao Patil) यांच्या मनधरणीचे काँग्रेसचे प्रयत्न शेवटी वायफळ ठरले. गोरेगावकरांनी भेट नाकारल्याने कर्नाटकातून आलेले आ. मोहन रेड्डी यांना हात हलवत परत जावे लागले.
नांदेड उत्तरची जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी हिंगोलीची जागा शिवसेनेला सोडली. त्या जागेवर मुस्लिम समाजाचे नेते माजी महापौर अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देण्यासाठी हिंगोली काँग्रेसचा दिलेला बळी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना अत्यंत जिव्हारी लागला आहे. पक्षाच्या या भूमिके विरूध्द हिंगोलीत काँग्रेसच्या तीन नेत्यांनी बंडाचे निशाण फडकविले आहे. यामध्ये माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, काँग्रेसचे माजी हिंगोली तालुकाध्यक्ष प्रकाश थोरात व हिंगोलीचे माजी नगराध्यक्ष सुधीरअप्पा सराफ यांचा समावेश आहे. यापैकी प्रकाश थोरात यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेऊन पक्षाची अधिकृत उमेदवारी दाखल केली असल्याने त्यांच्या मनधरणीचा प्रश्नच नव्हता. माजी नगराध्यक्ष सुधीरअप्पा सराफ यांची आ. मोहन रेड्डी यांनी भेट घेतली. सराफ यांनी त्यांना कसलाही शब्द न देता कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याने त्यानंतर उत्तर देणार असल्याचे सांगितले.
काँग्रेस पक्षाचे निरीक्षक मोहन रेड्डी यांना भेटावयाचे असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांनी माजी आमदार गोरेगावकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून सांगितले. मात्र माजी आमदार गोरेगावकर यांनी या पथकाची भेट घेण्यास स्पष्टपणे नकार दिल्याचे समजते.
निवडणुक लढविण्यावर भाऊराव पाटील गोरेगावकर ठाम
माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर (MLA Bhaurao Patil) हे हिंगोली विधानसभेची निवडणुक अपक्ष लढविण्यावर मात्र ठाम आहेत. त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरूवातही अपक्ष निवडणुक लढवूनच केली होती. काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर आजेगाव सर्कलमधून त्यांनी पहिली निवडणुक लढविली होती. स्वत:चे गोरेगाव हे सर्कल सोडून दुसर्या सर्कलमधून कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठबळा शिवाय गोरेगावकरांनी पहिली निवडणुक जिंकली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाकडे हिंगोली विधानसभेची उमेदवारी मागितली होती. त्यावेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी हिंगोली विधानसभेतून अपक्ष निवडणुक लढविली होती.
या निवडणुकीत ते पराभूत झाले परंतु त्यांच्या उमेदवारीचा फटका काँग्रेसचे उमेदवार तत्कालीन आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर (MLA Bhaurao Patil) यांना बसला. काँगे्रसचा पराभव होऊन हिंगोली विधानसभेवर पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला. त्यावेळी बळीराम पाटील कोटकर निवडून आले होते. एका दशकानंतर काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळालेले भाऊ पाटील गोरेगावकर सलग तीन वेळा हिंगोली विधानसभेवर निवडून आले. आपल्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी मतदार संघातील प्रत्येक गावात समर्थकांची जाळे निर्माण केले आहे. यामुळे आज घडीला आघाडीच्या उमेदवारापेक्षा तेच मजबूत उमेदवार आहेत. यामुळे ते रिंगणात राहतील हे निश्चित आहे.