आमदार दादाराव केचे थेट पोहोचले वाळू साठवून असलेल्या ठिकाणी
आर्वी (MLA Keche) : वर्धा जिल्ह्यात सर्वसामान्यांना वाळू मिळणे दुरापास्त झाले आहे. असे असताना नदीच्या तिरावर मात्र वाळूचे उंचच उंच ढिग लागलेले दिसले. वर्धा नदीच्या काठावर देऊरवाडा शिवारातील वाळूचे उंच ढिग, वाळू कढण्यासाठीची पाईप पाहून आमदारांना आश्चर्याचा धक्काच बसला. आमदार दादाराव केचे (MLA Keche) यांनी देऊरवाडा शिवारातील वाळू घाट परिसरात धडक देत पाहणी केली. यावेळी तेथील चित्र पाहून अवाक झाले. थेट आमदारच वाळूच्या घाटावर पोहोचल्याने सर्वांचीच भंबेरी उडाली.
देऊरवाडा परिसरातील साठवलेली वाळू तसेच परिस्थिती पाहून आमदारांना आश्चर्याचा धक्का
आर्वी तालुक्यातील देऊरवाडा शिवारातील वर्धा नदी पात्राच्या कडेला विधान परिषदेचे आमदार दादाराव केचे (MLA Keche) यांनी अचानक भेट देत पाहणी केली. यावेळी नदीलगतच्या परिसरात मोठे वाळूचे ढिग दिसून आले. तसेच वाळू उपसाकरिता पाईप तसेच इतर साहित्यदेखील दिसून आले. हे चित्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारे होते. एकीकडे जिल्ह्यातील डेपोंमध्ये जेमतेम वाळूसाठा आहे. वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया झालेली नाही.
अशात वाळू माफीयांकडून मोठ्या प्रमाणात वाळू चारी सुरू असल्याचा प्रकार परिस्थितीवरून निदर्शनास आला. नदीच्या कडेला अनेक ठिकाणी वाळूचे अवैध ठिय्ये असल्याचे दिसून आले. मोटर, मोठे पाईप्, चाळण्या, वाहने जाण्यासाठी मोकळी जागा, इतर साहित्य, वाळू साठवणीसाठी केलेली मोकळी जागा, दोन मोठे सोपासेट आणि आदी साहित्य आढळून आले. यातील बहुतांश साहित्य झुडपात लपवून ठेवल्याचे दिसून आले. आमदार दादाराव केचे (MLA Keche) यांनी यासंदर्भात उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार यांना फोन करून माहिती दिली.




