आ. मेघना बोर्डीकर यांचे महिलांना आश्वासन
परभणी/जिंतूर (MLA Meghna Bordikar) : विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये महिलांना आर्थिक सक्षमीकरण व शेतकर्यांसाठी तार फेंसिंग योजना राबविण्यात येणार आहे. महायुती सरकारकडून अशा योजनांची अंमलबजावणी देखील चालू आहे त्यामुळे येणार्या काळात शेतकरी व महिला सक्षमीकरणावर भर दिला जाणार असल्याची माहिती आमदार मेघना बोर्डीकर यांनी उपस्थितांना दिली.
बलसा, निवळी बु., निवळी खु., वर्णा आणि बोरी तांडा या गावात आ. मेघना बोर्डीकर यांच्या बैठका पार पडल्या. त्यावेळी त्या म्हणाल्या, महिला व शेतकर्यांसाठी एक सर्वसमावेशक विकास योजना आखण्यात आली आहे, ज्याद्वारे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि शेतकर्यांच्या सुरक्षेसाठी अनेक ठोस उपक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेंतर्गत, सुमारे २५,००० महिलांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टीने लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने महिलांना स्थिर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
महिलांना विविध व्यवसायिक प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या मागणीनुसार शेतकर्यांच्या हितासाठी तार फेन्सिंग योजना राबवून त्यांच्या शेतीचे संरक्षण करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत, शेताच्या कडेने मजबूत व टिकाऊ तार कुंपण घालून पिकांचे नुकसान रोखण्याचे उद्दिष्ट आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी घेत शेतकरी व महिलांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर राहणार आहोत असे शेवटी आ. मेघना बोर्डीकर म्हणाले. यावेळी ग्रामस्थ व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
अमित शहा यांची सभा
महायुती भाजपाच्या उमेदवार मेघना बोर्डीकर – साकोरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा बुधवार १३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता ठेवण्यात आली आहे. ही सभा जिंतूर येथील साई ग्राऊंड या ठिकाणी होणार आहे. सभेची तयारी जोरदार चालू झाली आहे.