बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : मागील चार दिवसापासून बुलढाणा विधानसभा मतदार संघातील बुलढाणा व मोताळा तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. मोताळा तालुक्यातील ११६ तर बुलढाणा तालुक्यातील ४५ गावातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचा शासनस्तरावरुन सर्वे करुन शेतकर्यांना सरसकट मदत देण्याची मागणी आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी १४ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
बुलढाणा मतदार संघात १० ते १३ ऑक्टोबर दरम्यान अवकाळी पावसाने मोठे थैमान घातल्याने मोताळा तालुक्यातील ११६ गावातील २१ हजार १८२ शेतकर्यांचे १८ हजार २४०हेक्टर क्षेत्रावरील तर बुलढाणा तालुक्यातील ४५ गावातील १७२५ शेतकर्यांचे ८७५ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, मका, कपाशी, तूर पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या हाती आलेले पीक वाया गेले आहे.
काही ठिकाणी शेतातील गंजी घालून ठेवलेल्या सोयाबीनच्या सुड्या वाहून गेल्या, विहिरी खचल्या असून जमिनी खरडून गेल्या आहेत. शेतामध्ये एक ते दीड फूट पाणी साचले आहे. सततच्या पावसाने अनेक गावांना पुराने वेढे घातलेले आहे. नैसर्गीक आपत्तीमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे सर्वे करण्याचे आदेश देवून शेतकर्यांना तात्काळ सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी करीत ज्या गावांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होतो अशा गावांना पूर संरक्षण भिंती मंजूर करुन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी सुध्दा आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.