आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी मांडला प्रश्न
हिंगोली (MLA Tanhaji Mutkule) : शहरातील जलेश्वर तलावाची दुरूस्ती व सौदर्यींकरणामुळे विस्थापित झालेल्या लोकांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी विधानसभेत मांडली.
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारच्या पहिल्या अधिवेशनात आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी जलेश्वर विस्थापितांचा प्रश्न शुक्रवारी उपस्थित केला. तलावाच्या कामाकरीता मागील ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे प्रशासनाने काढून या लोकांना बेघर केल्याचा प्रश्न आ. मुटकुळे यांनी उपस्थित केला. या विस्थापितांसाठी शासना तर्फे जमीन देऊन त्यावर म्हाडा किंवा इतर कोणत्याही योजनेतून घरे बांधून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
मार्च २०२४ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने जलेश्वर तलावाच्या परिसरात शासकीय जमिनीवर वास्तव्यास असलेल्या १९५ घर धारकांना या भागातून काढण्यात आले होते. त्यावेळी या भागातील नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली होती तर आ.तान्हाजी मुटकुळे व आ.संतोष बांगर यांनी हा मुद्दा मुख्यमंत्र्यासमोर मांडला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावर त्वरीत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. यानंतर काही दिवसांनी लोकसभेची आचार संहिता लागली. दोन सार्वत्रिक निवडणुकांच्या घाई गडबडीत मागे पडलेला हा मुद्दा आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी पहिल्याच अधिवेशनात उपस्थित केला. जलेश्वर परिसरातील विस्थापितांना शासकी योजनेतून घरे बांधून देण्याबाबत करण्यात आलेल्या या मागणीवर अधिवेशन संपल्यावर चर्चा होईल, असे आ.मुटकुळे यांनी देशोन्नतीशी बोलतांना सांगितले.
जलेश्वर तलावालगतचे १९५ घरे महसूल व पोलिसांच्या बंदोबस्तात हटविली होती. त्यांना घरे बांधून द्यावीत असा मुद्दा आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी शुक्रवारी विधानसभेत उपस्थित केला.
सध्या सुरू आहे सुशोभिकरण
जलेश्वर तलावालगतचे अतिक्रमण काढल्यानंतर मागील काही महिन्यांपासून सुशोभिकरणाची कामे सुरू आहेत. तलावातील गाळ उपसा, नवीन सिमेंट रस्ते, तलावाच्या चोहीबाजूने संरक्षण भिंत उभारणे आदी कामे सुरू आहेत.