हिंगोली (MLA Tanhaji Mutkule) : मागील १० वर्षांच्या कार्यकाळात मतदारसंघात पायाभूत सुविधांवर बरेच काम झालेले असून आगामी काळात सिंचन, शिक्षण व उद्योग निर्मितीवर भर देण्याकडे आपला कल राहील असा संकल्प भारतीय जनता पक्षाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी देशोन्नतीशी बोलताना व्यक्त केला. मंगळवारी हिंगोलीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी आपला संकल्पपत्र जाहीर केला. यावेळी माजी आ. रामराव वडकुते, जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, मिलिंद यंबल, उमेश नागरे, छत्तीसगढचे माजी आ. विरेंद्रसिंह साहू, दुर्गादास साकळे उपस्थित होते.
हिंगोलीच्या सिंचन अनुशेषाचा प्रश्न जवळपास मागील ६५ वर्षांपासून प्रलंबित आहे. यावर मागील १० वर्षांत थोडेफार काम मला करता आले, आगामी काळात सिंचनाचा हा अनुशेष पूर्णपणे भरून काढण्याचा संकल्प मी यापूर्वीच जाहीर केला आहे असे प्रतिपादन आ. मुटकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्ह्यात उत्पादित होणार्या शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग जर या मतदारसंघात उभारता आले तर अनेक विषय मार्गी लागतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. यामुळे जिल्ह्यात मोठे उद्योग येतील. असे उद्योग आल्यामुळे रोजगार निर्मिती होईल, शिवाय जिल्ह्यात जी शेती उत्पादने आहेत त्या शेतीमालाला बर्यापैकी भाव मिळेल. यामुळे सरकारने दिलेल्या हमीभावावर अवलंबून राहण्याची जिल्ह्यातील शेतकर्यांना गरजच राहणार नाही, असा आपला संकल्प आ. मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी व्यक्त केला.
अनेक अडचणींतून मार्ग काढत हिंगोली जिल्ह्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यावर्षी सुरू झाले आहे. आगामी काळात या वैद्यकीय महाविद्यालयाला जोडून एक मोठे रुग्णालय स्थापन करण्याकडे आपले विशेष लक्ष असेल, शिवाय सध्या हिंगोलीच्या या वैद्यकीय महाविद्यालयात केवळ शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत आहे लवकरच ही संख्या दुप्पट करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी (MLA Tanhaji Mutkule) सांगितले. या सोबतच वैद्यकीय व्यवसायात लागणारे इतर तंत्रज्ञ व तज्ञ कर्मचार्यांच्या प्रशिक्षणासाठी ही सोय करणार असल्याचे ते म्हणाले. हिंगोली शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी ८५ कोटीच्या कामांना मान्यता मिळाली असून याचे कार्यारंभ आदेश झालेले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कयाधू नदीवरील उर्वरित बांधार्यांसाठी शासनाकडे प्रस्ताव दिलेले असून लवकरच त्यांची मंजुरी घेऊन कामे सुरू करणार असल्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
हिंगोली शहरातील इंदिरा खुले नाट्यगृह व खुराणा पेट्रोल पंप समोरील नगरपरिषदेच्या जागेत बीओटी तत्त्वावर वातानुकूलित संकुल बांधण्याचाही आपला मानस असल्याचे मुटकुळे यांनी सांगितले. शहरातील एनटीसी भागात संत भगवान बाबा उद्यान जवळपास दोन कोटी रुपये खर्चून उभे केले जाणार आहे या कामाचे भूमिपूजन झाले असून याचा कार्यारंभ आदेशही झाला असल्याचे त्यांनी सांगितले. या सोबतच मतदारसंघात गाव तिथे व्यायाम शाळा, क्रीडांगण, वाचनालय व स्मशानभूमी ही मोहीम आपण राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात शेतीकडे जाणार्या पांदण रस्त्यांची राहिलेली कामेही येत्या काळात पूर्ण करणार असल्याचे (MLA Tanhaji Mutkule) त्यांनी सांगितले.