बांगलादेश (Bangladesh):- बांगलादेश एकीकडे राजकीय संकटातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे पुराने येथे कहर केला आहे. सततच्या पावसामुळे आणि नद्यांच्या फुगलेल्या पाण्यामुळे बांगलादेशातील अनेक भाग पुराच्या विळख्यात आहेत. पुरामुळे(Flood)20 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 50 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून लोकांना अन्न आणि शुद्ध पाणीही मिळत नाही. राजधानी ढाका आणि मुख्य बंदर शहर चितगाव दरम्यान महामार्ग आणि रेल्वे मार्ग खराब झाले आहेत, ज्यामुळे पूरग्रस्त भागात प्रवेश करणे कठीण झाले आहे.
काय म्हणाले मोहम्मद युनूस?
पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागात कॉक्स बाजारचा समावेश आहे, जेथे शेजारच्या म्यानमारमधील सुमारे दहा लाख रोहिंग्या निर्वासितांनी आपले घर बनवले आहे. दरम्यान, बांगलादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी एका दूरचित्रवाणी(Television) भाषणात सांगितले की, पूरग्रस्तांना सामान्य स्थितीत परत येण्यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शेजारील देशांशी चर्चा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
परिस्थिती गंभीर असू शकते
मान्सूनचा पाऊस असाच सुरू राहिल्यास पूरस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशारा बांगलादेशच्या हवामान खात्याने दिला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की 11 पूरग्रस्त जिल्ह्यांतील सुमारे 3,500 मदत शिबिरांमध्ये चार लाखांहून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. मदत शिबिरांमध्ये सुमारे 750 वैद्यकीय पथके (Medical teams) उपचारासाठी उपस्थित आहेत. लष्कर, हवाई दल, नौदल आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश बचाव कार्यात मदत करत आहेत.
पावसामुळे दरवर्षी होतो विनाश
कोमिल्ला जिल्ह्यातील एका गावातील शेतकरी अब्दुल हलीम (६५) यांनी सांगितले की, त्यांची झोपडी मध्यरात्री पुराच्या पाण्यात वाहून गेली. ते म्हणाले की तेथे कोणतेही सामान शिल्लक नाही आणि पिण्याचे पाणी नाही. गावांमध्ये क्वचितच कोणी मदत पोहोचवली असेल. बांगलादेश हा शेकडो नद्यांनी वेढलेला आहे आणि अलिकडच्या काही दशकांत येथे पुरासारख्या दुर्घटना अनेकदा पाहावयास मिळाल्या आहेत हेही लक्षात घेण्यासारखे आहे. मान्सूनच्या पावसामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर विनाश होतो.